
मुंबई – स्वारगेट बसस्थानकावर १६ फेब्रुवारीला घडलेल्या घटनेनंतर शासनाने तातडीने या प्रकरणाची नोंद घेतली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहे. यापुढे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेविषयी हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे निवेदन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले. या प्रकरणात हलगर्जीपणा आढळल्याने ४ अधिकार्यांना निलंबित केले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेविषयी हलगर्जीपणा झाल्याने स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुख यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीच्या अहवालानुसार, एस्.टी. महामंडळाने बसस्थानकावर कार्यरत असलेल्या २२ सुरक्षारक्षकांचे तातडीने स्थानांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा मंडळाला देण्यात आल्या आहेत.