पणजी, १३ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यशासनाच्या गृह खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या बांधकाम व्यवसायातील आस्थापनाला वादग्रस्त विज्ञापन हटवण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या आस्थापनाने गोवा शासनाला पत्र पाठवून हे विज्ञापन ३१ जुलै या दिवशीच हटवण्यात आल्याचे म्हटले आहे आणि या विज्ञापनामुळे गोमंतकियांच्या भावना दुखावल्याने जनतेची क्षमा मागत असल्याचे म्हटले आहे.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
या विज्ञापनावर ‘देश चालवणार्या देहलीवासियांनो, गोवा जिंका’ असे गोव्याविषयी आक्षेपार्ह लिखाण होते. या विज्ञापनाला अनेकांनी आक्षेप घेतला होता. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या वेळी हे विज्ञापन हटवण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर गृह खात्याच्या अवर सचिवांनी आस्थापनाला पत्र लिहून ‘हे विज्ञापन हटवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली होती. गोवा शासनाला उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ म्हणते, ‘‘हे विज्ञापन एका भागीदार आस्थापनाने ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केले होते. हे विज्ञापन निदर्शनास आल्यानंतर ते हटवण्याचे निर्देश दिले होते. संबंधित भागीदार आस्थापनाने हे विज्ञापन हटवल्याचे ई-मेलद्वारे कळवले आहे.’’
गोमंतकियांची मागितली क्षमा
पत्रात ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ हे आस्थापन पुढे म्हणते, ‘‘जनभावना दुखावल्या गेल्यास आम्ही क्षमा मागतो. आमचे आस्थापन गोमंतकीय संस्कृती आणि वारसा यांचा आदर करते. गोमंतकियांनी दाखवलेला पाठिंबा आणि आदरातिथ्य यांबद्दलही आम्ही गोमंतकियांचे
ऋणी आहोत.’’