India-US Joint Military Exercise : बिकानेरमध्‍ये भारत आणि अमेरिका यांचा संयुक्‍त सैनिकी सरावास प्रारंभ

बिकानेर (राजस्‍थान) – वालुकामय ढिगार्‍यात ९ सप्‍टेंबरपासून भारत आणि अमेरिका यांच्‍या संयुक्‍त सरावास प्रारंभ झाला. दोन्‍ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्धसराव २२ सप्‍टेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. या संयुक्‍त सैनिकी सरावाचा उद्देश दोन्‍ही सैन्‍यांमधील समन्‍वय बळकट करणे आणि देश अन् जगासमोरील सुरक्षा आव्‍हाने सोडवणे, हा आहे. या सरावाच्‍या अंतर्गत उप-पारंपरिक क्षेत्रात संयुक्‍त सैनिकी क्षमता आणि आतंकवादविरोधी कृती वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित केले जाईल. युद्ध सरावासाठी अमेरिकी पथक ८ सप्‍टेंबरला संध्‍याकाळी ‘महाजन फायरिंग रेंज’वर पोहोचले.

दोन्‍ही देशांचे सैनिक आपापल्‍या शस्‍त्रांची चाचणीही घेतील. भारतीय सैनिक अमेरिकी सैनिकांना आकाशातून खाली उतरून शत्रूचे लक्ष्य नष्‍ट करण्‍याचे प्रशिक्षण देतील. भारतात बनवलेल्‍या शस्‍त्रांस्‍त्रांचे प्रदर्शनही भरवण्‍यात येणार आहे. भारतीय सैनिक अमेरिकी शस्‍त्रांस्‍त्रांचे प्रशिक्षण घेतील. भारतीय सैनिक ‘एके २०३’ रायफलसारखी आधुनिक शस्‍त्रे वापरतील.

अमेरिका भारतात प्रथमच वापरणार ‘हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्‍टिम’ !

अमेरिकेकडून प्रथमच भारतीय सैन्‍याच्‍या ‘महाजन फील्‍ड फायरिंग रेंज’मध्‍ये ‘हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्‍टिम’ तैनात करण्‍यात येणार आहे. ही यंत्रणा लांब अंतरावर अचूक आक्रमण करण्‍यास सक्षम आहे.