सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषद !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसामध्ये प्रतिष्ठा निर्माण केली. त्यामुळे सर्वसामान्य लोकही राष्ट्रकार्याला लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे केवळ २१ व्या शतकातच नव्हे, तर इतर कोणत्याही काळात ते महत्त्वाचे ठरणार आहे. स्वयंभू, स्वधर्म, स्वराज्य, साक्षेप आणि स्वयंसिद्धता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतांना त्या वेळची पार्श्वभूमी, वर्तमान आणि भविष्य यांचा विचार करायला हवा, असे मत मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. पांडुरंग बलकवडे आणि विद्यापिठातील मान्यवर उपस्थित होते.
श्री. रावत म्हणाले की, तत्कालिन भारतातील सहिष्णु समाज जिवंत ठेवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यामुळे हिंदु समाजामध्ये त्यानंतरच्या काळातील प्रबोधनाचे युग अवतरू शकले.