Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !

  • बांगलादेशातील सत्तापालटामागे पाकिस्तान आणि अमेरिका असल्याचे उघड !

  • पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.वर होते दायित्व !

ढाका (बांगलादेश) – ‘नॉर्थ ईस्ट न्यूज’च्या वृत्तानुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना बांगलादेशाच्या आतून आणि बाहेरून मिळालेल्या माहितीचे विविध पैलू एकत्र करून असे आढळून आले की, बांगलादेशी विद्यार्थी संघटनांचे ‘समन्वयक’ बनलेल्या काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान, दुबई आणि कतार येथे अनेक वेळा भेट दिली होती. येथे या विद्यार्थी नेत्यांनी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या गुप्तचर अन् सुरक्षा अधिकारी यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात यावर्षी हिंसक आंदोलन झाले आणि त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना त्यागपत्र देऊन देश सोडून पळून जावे लागले.

१. बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या महंमद महफूज आलम याची अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे विशेष साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी परदेशात जाऊन पाकिस्तानी आणि अमेरिकी  अधिकार्‍यांना भेटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आलमचाही समावेश होता.

२. बांगलादेशी गुप्तचर यंत्रणांना संशय येऊ नये; म्हणून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तारखांना परदेशात जाण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले आहे.

३. आय.एस्.आय.च्या एका निवृत्त लेफ्टनंट जनरलकडे बांगलादेशी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचे काम सोपवण्यात आले होते. टोपणनावाने काम करणार्‍या या सेवानिवृत्त जनरलने वर्षभरात अनेक वेळा बांगलादेशाला भेट दिली होती. तो एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या काळात दोहा (कतार) येथील एका हॉटेलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या गटाला भेटला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आणि विशेषत: तत्कालीन राजदूत पीटर हास ‘निष्पक्ष निवडणुका’ घेण्यासाठी तत्कालीन शेख हसीना सरकारवर राजनैतिक दबाव आणत असतांना हे घडले.

४. दोहा येथील ज्या हॉटेलमध्ये बांगलादेशी विद्यार्थी रहात होते, त्याच हॉटेलमध्ये काही अमेरिकी नागरिक थांबले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला असल्याचा संशय भारतीय सुरक्षा अधिकार्‍यांना आहे.

५.  बांगलादेशातील एका सामाजिक विकास क्षेत्रातील व्यावसायिकाने विद्यार्थ्यांसह दोहा येथे या निवृत्त जनरलचीही भेट घेतल्याचा संशय आहे. ही व्यक्ती आता अंतरिम सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर आहे.

६. भारतीय सुरक्षा तज्ञांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांच्या बैठकीविषयी काही माहिती होती; परंतु ते हसीना सरकार पाडण्याच्या कटाचा अंदाज घेऊ शकले नाहीत. एका अधिकार्‍याने सांगितले की, हसीना यांना मे २०२४ मध्ये विद्यार्थी आणि विद्यापिठातील प्राध्यापक यांचा समावेश असलेल्या अमेरिकी कटाविषयी माहिती देण्यात आली होती; परंतु त्यांनाही कटाची खोली समजू शकली नाही.

संपादकीय भूमिका

जे आतापर्यंत सांगितले जात होते, ते सत्य होते, हेच यातून स्पष्ट होते ! अमेरिका आणि पाकिस्तान भारताचेही शत्रूच आहेत. भारताच्या विरोधातही ते कटकारस्थाने रचत आहेत. त्यामुळे भारताने त्यांच्यापासून अधिक सतर्क रहाण्यासह प्रत्युत्तर म्हणून या देशांत कारवाया करणे आवश्यक आहे. आक्रमण हेच बचावाचे प्रमुख शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे !