प्राचीन हिंदु धर्मशास्‍त्र सामान्‍य माणसाला समजावून सांगणे, ही काळाची आवश्‍यकता ! – चंद्रकांत पाटील, उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोल्‍हापूर – धर्म म्‍हणजे काय ? जन्‍मापासून ते मृत्‍यपर्यंतचे सर्व विधी का आणि कशासाठी ? त्‍यांमागील तत्त्वज्ञान काय ? अशा गोष्‍टी सामान्‍य माणसाला सोप्‍या भाषेत समजावून सांगितल्‍या, तर आपली संस्‍कृती आणखी समृद्ध होईल, असे प्रतिपादन उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्‍हापूर जिल्‍हा ब्राह्मण पुरोहित संघाच्‍या मुख्‍य कार्यालयाच्‍या उद़्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते ब्राह्मण संघातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पेंडसेशास्‍त्री यांच्‍या प्रतिमांचे पूजन करण्‍यात आले. या वेळी ‘महालक्ष्मी वेद वेदांग पाठशाळे’तील आचार्य सुधाकर काजरेकर आणि समस्‍त विद्यार्थ्‍यांनी वेदमंत्रांचे पठण केले. यानंतर चंद्रकांत पाटील आणि सौ. अंजली पाटील यांच्‍या हस्‍ते संघाच्‍या कोनशिलेचे अनावरण झाले. संघाचे अध्‍यक्ष प्रसाद निगुडकर यांनी संघ स्‍थापनेचा उद्देश, संघाने वेद वेदांग पाठशाळेच्‍या माध्‍यमातून आजपर्यंत घडवलेले विद्यार्थी, तसेच संघाचे समाजातील सर्व घटकांसाठीचे कार्य यांची माहिती दिली.

संघाचे अध्‍यक्ष प्रसाद निगुडकर यांनी शाल, पुणेरी पगडी आणि मानपत्र देऊन चंद्रकांत पाटील यांचा सन्‍मान केला. सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले, आभार स्‍वप्‍नील जोशी यांनी मानले. या वेळी नीलेश कुलकर्णी, नरेंद्र खासबारदार, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, श्रीकांत लिमये, विनोद डिग्रजकर, राजू मेवेकरी यांसह अन्‍य उपस्‍थित होते.