मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !
पुणे – बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणार्या मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, असा आरोप करत देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी झाली होती. धनंजय यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे; अद्याप अन्य आरोपी पसार आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलन चालू केले आहे. बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने दूरभाष येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘माझा भ्रमणभाष क्रमांक फेसबूकवर टाकला असून ‘पोस्ट’मध्ये खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. काहींनी अश्लील प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला आहे’, अशी माहिती दमानिया यांनी दिली.