टोकियो (जपान) – जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती असणार्या टोमिको इत्सुका या महिलेचे वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. इत्सुका यांचा जन्म २३ मे १९०८ या दिवशी जपानमधील आशिया शहरात झाला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सप्टेंबर २०२४ मध्ये इत्सुका यांना जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली. इत्सुका यांच्या मृत्यूनंतर ब्राझिलच्या इनाह कॅनाबारो लुकास आता जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती बनल्या आहेत. त्या ११६ वर्षांच्या आहेत. इत्सुकांच्या जन्मानंतर १६ दिवसांनी त्यांचा जन्म झाला.
इत्सुकांच्या कुटुंबियांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, इत्सुका यांना लांब फिरायला जायला आवडते. हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या डोंगरावर वसलेल्या मंदिरात जात असत. वयाच्या १०० व्या वर्षीही त्यांना चालण्यासाठी काठीची आवश्यकता भासली नाही. वयाच्या ७० व्या वर्षीही त्यांनी दोनदा माऊंट ओंटेक या पर्वतावर चढाई केली. त्याची उंची ३ सहस्र ६७ मीटर (१० सहस्र ६२ फूट) आहे.