राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांकडून बेमुदत संप चालू !

मुंबई – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातील कामगार संयुक्त कृती समितीने त्यांच्या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. ३ सप्टेंबर या दिवशी ३५ आगारांमध्ये संप पुकारण्यात आला. या आगारांमध्ये कामबंद आंदोलन चालू झाले. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्यासह खासगी वाहतूकदारांकडूनही त्यांची लुबाडणूक झाली. अनेकांना त्यांचा प्रवास रहित करावा लागला. राज्यातील अनेक आगारांवर सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

आगारामध्ये शुकशुकाट !

मुंबईतून कोकणात जाण्यासाठी साडेचार सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण झाले आहे. गणेशोत्सवासाठी बर्‍याच जणांनी ६ महिन्यांपूर्वीच एस्.टी.चे आरक्षण केले होते; मात्र आता त्यांना अडचण येणार आहे. या पार्श्वभूमीवर या संपावर तोडगा काढणे सरकारसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. पुणे, कोकणसह राज्यातील अनेक आगारांतील प्रवाशांना संपाला तोेंड द्यावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे अत्यंत हाल झाले. या संपामुळे एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

सरकारने रेल्वेकडून मागितले साहाय्य !

कोकणात जाणार्‍यांची अडचण लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाने आता रेल्वे विभागाकडे साहाय्य करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मध्य रेल्वेला जादा गाड्या सोडण्यास सांगितले आहे. मध्य रेल्वेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून दिवा किंवा पनवेल स्थानकातून विशेष गाड्या सोडण्याची सिद्धता मध्य रेल्वेने दर्शवली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ५ जादा गाड्या चालवण्याची सिद्धता ठेवली आहे. या गाड्या दिवा किंवा पनवेल स्थानकातून सुटतील. या २ स्थानकांपैकी कोणत्या स्थानकावरून विशेष गाडी सोडायची ? याचा निर्णय त्या वेळेनुसार घेतला जाईल.


एस्.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्या !

  • राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच एस्.टी. कर्मचार्‍यांना वेतन मिळावे.
  • प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा.
  • ४ सहस्र ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मूळ वेतनात घोषित केलेल्या ५, ४ आणि आणि अडीच सहस्र रुपयांऐवजी सरसकट ५ सहस्र रुपये मिळावेत.

४ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले !

४ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कृती समितीला संपावर तोडगा काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने कर्मचारी संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

एस्.टी. संपाविषयी सकारात्मक तोडगा निघेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोठमोठ्या प्रकरणांत आपण चर्चा करून सकारात्मक तोडगा काढलेला आहे. त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल. एस्.टी. कर्मचार्‍यांनी संप करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ सप्टेंबर या दिवशी दुपारी केले.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसे आहेत ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

जे लोक आंदोलन करत आहेत, ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्याशी संबंधित आहेत. काही बोटावर मोजण्याइतके आणि एस्.टी.मधून निलंबित करण्यात आलेले लोक आंदोलन करत आहेत. नोकरीवर असतांना प्रदीर्घ काळ रजा घेऊन मजा मारणारी ही लोकं आहेत. यांनी लिहून देतांना धरणे आंदोलन करत असल्याचे सांगितले; मात्र कर्मचार्‍यांना संप करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सातव्या वेतन आयोगाविषयी विचार करण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी दसर्‍या मेळाव्यालाच त्याची कार्यवाही पूर्ण केली होती; मात्र कृती समितीने अडचणी आणून ती होऊ दिली नाही. कारण त्यांना बीओटी तत्त्वावरील करारातील पाच टक्के मलई खायची होती. १२४ एस्.टी. कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा सुप्रिया सुळे कुठे होत्या ? तेव्हा त्या संसदेत का बोलल्या नाहीत ?


मंत्र्यांची आश्वासने

मुख्यमंत्री तात्काळ निर्णय घेतील ! – अब्दुल सत्तार

गोपीचंद पडळकरांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करू ! – सामंत


पडळकर आणि खोत यांच्या संघटना संपात सहभागी होणार !

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या संघटना संपात सहभागी होणार असल्याची चेतावणी त्यांनी ३ सप्टेंबर या दिवशी दिली.


लातूर येथे राष्ट्रपती दौर्‍याच्या वेळी गैरसोय !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लातूर दौर्‍यासाठी ६०० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते; एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे ३९६ पैकी ३४६ फैर्‍या रहित करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

आगारामध्ये शुकशुकाट !

संपामुळे राज्यभर प्रवाशांची मोठी गैरसोय !

अहिल्यानगर – येथील अनेक आगार बंद राहिल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले !

लातूर – प्रवाशांची गैरसोय झाली आणि खासगी वाहतूकदारांनी त्याचा लाभ उठवून वारेमाप भाडेवाढ करून प्रवाशांना अक्षरशः लुटले !

बुलढाणा – प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडले, त्यामुळे त्यांना बराच मनस्ताप झाला !

धाराशीव – ५ आगारांत धरणे आंदोलनामुळे काम पूर्ण ठप्प !

या संपाचा सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, विदर्भ आणि मराठवाडा, कोकण येथील प्रवाशांना फटका बसला असून संप असल्याची माहिती नसलेले अनेक प्रवासी बस स्थानकावर एस्.टी.ची वाट पहात असल्याचे दिसून आले, तर काही स्थानकांवर शुकशुकाट होता.