12th India Festival Wisconsin : अमेरिकेत ‘स्पिन्डल इंडिया’च्या वतीने ‘१२ वा भारत महोत्सव व्हिस्कॉन्सिन’ साजरा !

  • हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न !

  • राजकीय नेत्यांकडून कौतुक !

डावीकडून भारत प्रसाद, अर्णब बाग, अपर्णा बाग, मेरी जो थॉमसन, लोर्ड्स मॅकइवान, पूर्णिमा नाथ, शुभ्रा प्रसाद आणि अशिता वर्मा

मिलवाऊकी (अमेरिका) – अमेरिकेच्या व्हिस्कॉन्सिन राज्यातील मिलवाऊकी शहरात ‘स्पिन्डल इंडिया’ या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने १२ वा वार्षिक ‘भारत महोत्सव’ (इंडिया फेस्ट) साजरा करण्यात आला. नुकत्याच झालेल्या भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या महोत्सवात श्री गणेशाचे वंदन करून हिंदु समुदायातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. या प्रसंगी भारत आणि अमेरिका यांचे राष्ट्रगीत गायले गेले. त्यानंतर देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. याची माहिती ‘स्पिन्डल इंडिया’ संस्थेच्या संस्थापिका पूर्णिमा नाथ यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. हा महोत्सव २४ ऑगस्ट या दिवशी पार पडला.

१. व्हिस्कॉन्सिन राज्याचे गव्हर्नर टोनी इव्हर्स यांनी या वेळी १५ ऑगस्ट २०२४ ला ‘इंडिया डे’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले.

२. व्हिस्कॉन्सिनमध्ये ‘भारत महोत्सव’ साजरा करण्याच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. या कार्याची दखल घेणार्‍यांमध्ये मिलवाऊकी काऊंटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅव्हिड क्राऊले, वोकेशा काऊंटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल फॅरो, मिलवाऊकी शहराचे महापौर कॅव्हॅलियर जॉन्सन आणि ब्रूकफिल्डचे महापौर स्टिवन पोंटो यांचा समावेश होता.

३. या कार्यक्रमाला अमेरिकी काँग्रेसचे सदस्य (खासदार) ग्रॉथमन, प्रशासकीय अधिकारी विनोद गौतम, वोकेशा काऊंटीचे अध्यक्ष जेम्स हेनरिच, रिपब्लीकन पक्षाचे ‘काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट ४’चे अध्यक्ष रॉबर्ट स्पिन्डेल आणि व्हिस्कॉन्सिन राज्यातील काँग्रेसचे सदस्य (सिनेटर) ड्युए स्ट्रॉयबेल हे उपस्थित होते.

४. सर्वांनी व्हिस्कॉन्सिन राज्यातील हिंदु समुदायाचे कौतुक केले आणि अमेरिकेच्या हितासाठी ते देत असलेल्या अमूल्य योगदानाविषयी आभार व्यक्त केला.

५. वर्ष २०१३ पासून ‘स्पिन्डल इंडिया’च्या वतीने घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतातील संस्कृती, वारसा, सभ्यता यांचे दर्शन घडत असल्यावरूनही मान्यवरांनी कौतुक केले.

६. अमेरिकेतील बांगलादेशाचे महावाणिज्यदूत मोनीर चौधरी आणि नेपाळचे महावाणिज्यदूत मार्विन ब्रुस्टिन यांनीही महोत्सवासाठी त्यांचे शुभसंदेश पाठवले होते.

अशा महोत्सवांतून भारतीय संस्कृतीविषयी अमेरिकेत असलेले गैरसमज दूर होण्यास साहाय्य होईल ! – पूर्णिमा नाथ

‘स्पिन्डल इंडिया’च्या संस्थापिका पूर्णिमा नाथ

‘स्पिन्डल इंडिया’च्या संस्थापिका पूर्णिमा नाथ या वेळी म्हणाल्या, महोत्सवात भारत आणि अमेरिका यांचे राष्ट्रध्वज फडकावण्यात आले होते. यातून उभय देशांमधील सशक्त संबंध, तसेच प्रेम आणि आदर यांचे दर्शन घडते. दोन्ही देशांतील सहयोगाला सशक्त करण्यासाठीही या माध्यमातून प्रोत्साहन मिळते. अमेरिकेत भारतीय संस्कृतीविषयी फारशी माहिती नाही. शोध, नवशोध, विचारसरणी, सर्वसमावेशकता, सहिष्णुता, तसेच सर्वांत प्राचीन जीवित सभ्यता अशी वैशिष्ट्ये असलेल्या हिंदु धर्माला अजून तितकेसे स्वीकारले गेलेले नाही. अमेरिकेच्या नागरिकांमध्ये दुर्दैवाने भारत आणि भारतीय संस्कृती यांविषयी अजूनही गैरसमज आहेत. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून असे अवरोध नष्ट होण्यास साहाय्य होईल.

संपादकीय भूमिका

‘स्पिन्डल इंडिया’ या संस्थेचे अभिनंदन ! सातासमुद्रापलीकडेही हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. अशा संस्थाच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !