गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण कोरियात ‘मकबँग’ हा ‘ट्रेंड’ (कल) प्रचंड लोकप्रिय झाला आहे. याचा अर्थ रील किंवा व्हिडिओ करणारे (‘इन्फ्ल्युएन्सर’) त्यांचे थेट प्रक्षेपण (‘लाईव्ह स्ट्रिमिंग’) करत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचे सेवन करतात. पॅन शाउटिंग नामक तरुणी ही एक ‘मकबँग इन्फ्लुएन्सर’ होती. तिने गेल्या काही वर्षांमध्ये मकबँगचे व्हिडिओ सिद्ध करून सामाजिक माध्यमावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. त्यामधून तिला प्रचंड पैसेही मिळाला होता. पॅन शाउटिंगने तिची नोकरी सोडून पूर्णवेळ इन्फ्लुएन्सर म्हणून कामाला आरंभ केला; मात्र साहजिकच सततच्या अतीखाण्याच्या सवयीने पॅनच्या तब्येतीवर परिणाम व्हायला आरंभ झाला. पॅन शाउटिंग अनेकदा एका थेट प्रक्षेपणाच्या वेळी १० किलो खाद्यपदार्थ खायची. कधीकधी ती सलग १० घंटे खात रहायची. या घातक सवयीमुळे तिला अनेकदा रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. पोटातील पचन न झालेल्या अन्नपदार्थांमुळे तिला शरीराच्या खालच्या बाजूची हालचाल करता येत नसे. या २४ वर्षीय तरुणीचा १४ जुलैला नेहमीप्रमाणे थेट प्रक्षेपण करत असतांनाच मृत्यू झाला. पॅनचा मृत्यू झाला, तेव्हा तिचे वजन तब्बल ३०० किलो होते. सामाजिक माध्यमांवर मिळणारी प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा यांचा हव्यास तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. पॅन शाउटिंग हिच्या माता-पित्यांनी तिला अशा प्रकारे व्हिडिओ बनवणे आणि अतीखाणे याविषयी सतर्क केले होते. त्यातील संभाव्य धोके समजावून सांगितले होते. पैशांच्या हव्यासापोटी आपण स्वतःची किती अपरिमित हानी करून घेत आहोत, याची जाणीवच तिला झाली नाही. मुलत: एखादा उद्योगधंदा किंवा चाकरी करून अर्थार्जन करणे हे आपला योगक्षेम चालवण्यासाठी आवश्यक आहे; मात्र त्या नादात आपण काय चुकीचे करत आहोत ? हेच आजकालच्या तरुणांच्या लक्षात येत नाही. षड्रिपूंपैकी एक असलेल्या लोभानेच तिची सदसद्विवेकबुद्धी नष्ट केली आणि तिला योग्य-अयोग्याचे भानच उरले नाही.
प्रसिद्धी आणि पैसे यांच्या हव्यासापोटी जाणतेपणाने आत्महत्या करण्यासारखे झाले हे ! मानवजन्माचे इतक्या पराकोटीचे अवमूल्यांकन झाले का ? जीवच नसला, तर तो मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी यांचे काय मोल ? पॅन शाउटिंग हिच्या मृत्यूमुळे दक्षिण कोरियातील ‘मकबँग ट्रेंड’विषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आज समाजात अनेक तरुण सामाजिक माध्यमाच्या मायाजालात गुरफटलेले आहेत. त्यांना या मायाजालातून बाहेर काढायचे असल्यास प्रथम अशा प्रकारची अतिरेकी ट्रेंड चालवणारी आस्थापने बंद करायला हवीत. सामाजिक माध्यमांवर कडक निर्बंध घालून कठोर शासन व्हायला हवे. धर्माचरण केल्याने ‘अती तिथे माती’ होते, हा विवेक जागृत रहातो आणि अशा विकृत गोष्टी आणि प्रलोभने यांपासून दूर रहाण्यास साहाय्य होते !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.