नेटफ्लिक्स या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर ‘आयसी ८१४ : दी कंदहार हायजॅक’ ही मालिका चालू आहे. या मालिकेच्या काही भागांचे प्रसारण झाले आहे. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या ‘आयसी ८१४’ या विमानाचे अपहरण झालेल्या घटनेवर मालिका आधारित आहे. या मालिकेत धक्कादायक, म्हणजे विमान अपहरण करणार्या आतंकवाद्यांची नावे हिंदु दाखवली आहेत. अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावरील विमान अपहरण कशासाठी झाले होते ? हे जगजाहीर आहे. भारताच्या कह्यातील मसूद अझहर या कुख्यात आतंकवाद्याला सोडवण्यासाठी हे अपहरण झाले होते. या अपहरणातील ५ आतंकवाद्यांची नावे इब्राहीम अख्तर, शहीद अख्तर सईद, सुन्नी अहमद काझी, झहीर मिस्त्री आणि शकीर अशी होती; मात्र दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी त्यांची नावे भोला, शंकर यांच्या व्यतिरिक्त अन्य नावे बर्गर आणि डॉक्टर अशी ठेवली आहेत. अशी नावे का ठेवली आहेत ? अनुभव सिन्हा यांना आतंकवादाचा अनुभव नाही, असे म्हणायचे आहे का कि जाणीवपूर्वक त्यांनी ते भारतियांवर थोपवले आहे ?
‘वोक’ विकृतीचा प्रकार ?
याविषयी ‘‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे लेखक अभिजित जोग यांनी सांगितले की, ‘जमात ए पुरोगामी’ ज्यांनी पुरोगामित्व आणि निधर्मीपणा यांच्या व्याख्या केल्या, त्यामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. हिंदू हे सातत्याने आतंकवादामुळे अत्याचार सहन करतात, हे लक्षात आणून देण्यासाठी ‘वोक संस्कृती’च्या पुरस्कर्त्यांना दूर केले पाहिजे.’ या मालिकेत दाखवण्यात आलेला प्रकार हा खरोखरीच ‘वोक’ चळवळीचा भाग आहे. मूळ घटनेत आतंकवाद्यांच्या मुक्ततेसाठी आतंकवाद्यांनी आक्रमणाचा प्रकार केला असला, तरी त्यांचा धर्म न पहाता दर्शकांच्या, म्हणजेच लोकांच्या मनावर ‘आतंकवादी ‘हिंदु’ होते’, असे बिंबवायचे. येथे मुसलमानांच्या आक्रमकतेकडे, धर्मांधतेकडे दुर्लक्ष करून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि ‘हिंदु हे अत्याचारी असतात’, हे पद्धतशीरपणे रूढ करायचे. आतंकवादाचे आणि वोक विकृतीचे पुरस्कर्ते यांचा हा छुपा कार्यक्रमच आहे. मूळ घटना काही असली, कितीही भीषण असली, त्यात हिंदूंवर कितीही अत्याचार झाले असले, तरी ती मांडतांना स्वत:ला हवी तशी मांडणे, स्वत:ला हवी तशी पात्रे निवडणे आणि उलट ‘हिंदूंनीच अत्याचार केले’, असे मांडण्याचा प्रयत्न होतो, हा एक प्रकारचा आतंकवाद आहे, ‘नाव जिहाद’चा प्रकार आहे.
समाजाची दिशाभूल !
मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भीषण आक्रमण केले. शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आतंकवाद्यांनी हातावर हिंदूंप्रमाणे लाल धागे बांधले होते, असे लक्षात आले. आतंकवादी अजमल कसाबला ‘समीर चौधरी’ हे हिंदु नाव देऊन त्याच्या हातावर लाल धागा बांधला होता, अशीही माहिती पुढे आली. या घटनेविषयी माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिले ‘हू किल्ड करकरे ?’ (करकरेंना कुणी मारले ?) यामध्ये मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक करकरे यांच्या मृत्यूस पुण्याच्या ब्राह्मणांना उत्तरदायी ठरवले, म्हणजे जणू ब्राह्मणांनीच त्यांची हत्या केली. खरेतर ही खोटी, दिशाभूल करणारी आणि राष्ट्रविरोधी माहिती होती. हिंदु समाज आणि ब्राह्मण यांची अपकीर्ती करणारी माहिती होती; मात्र याविषयी मुश्रीफ यांना शिक्षा होणे तर दूरच, काही तुरळक हिंदु संघटनांच्या व्यतिरिक्त कुणी याचा निषेधही केला नाही. हा ‘वोक’ विकृतीचाच प्रकार आहे.
बॉलीवूडची परंपरा !
‘दिलजले’ या हिंदी चित्रपटामध्ये काश्मीरमधील सर्वांत भयानक आतंकवाद्याचे पात्र साकारणारा अभिनेता अजय देवगण टिळा लावलेला दाखवण्यात आला. ‘मैं हूँ ना’ या हिंदी चित्रपटामध्येही हिंदु आतंकवादी दाखवण्यात आला आहे. ‘फायर’ कादंबरीतील मूळ नावे बेगम जान आणि राब्बो असून चित्रपटात ती पालटून राधा आणि सीता अशी ठेवण्यात आली. साडी नेसणार्या वन अधिकारी के.एम्. अभारना आणि अशगर अली यांच्यातील संघर्षावरील ‘शेरनी’ चित्रपटात त्यांची नावे अनुक्रमे विद्या विन्सेंट आणि गुंड रंजन राजहंस, अशी दाखवली आहेत. ‘चक दे इंडिया’मध्ये मूळ कोचचे नाव ‘रंजन नेगी’ असतांना ते ‘कबीर खान’, असे दाखवले आहे. बॉलीवूडमध्ये पटकथा लेखक जावेद अख्तर, सलीम खान, म्हणजे वरकरणी निधर्मी; मात्र अंत:स्थ जिहादी मानसिकतेचे असल्यामुळे ‘वाईट मुसलमानांच्या जागी हिंदु पात्र दाखवणे आणि चांगल्या हिंदु व्यक्तींची पात्रे साकारतांना त्यांना चित्रपटात मुसलमान नाव द्यायचे’, असे प्रकार करतांना आढळतात. हा सर्व प्रकार ‘सर्वधर्मसमभाव’, ‘आतंकवादाला धर्म नसतो’, ‘धर्मांध कोणत्याही धर्मातील असो तो वाईटच’, या घासून गुळगुळीत झालेल्या वेगवेगळ्या खोट्या कथानकांवर (नॅरेटिव्ह) आधारित असतो. बॉलीवूडला खासगीत एकतर ‘ड्रगवूड’ अथवा ‘दाऊदवूड’ (कुख्यात दाऊदच्या हाताखालील बॉलीवूड), असे म्हटले जाते.
असे फसवणूक करणारे, समाजमनाची दिशाभूल करणारे चित्रपट ओटीटी माध्यमाद्वारे दाखवले जातात आणि त्यावर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे नियंत्रणही नसते. त्यामुळे चुकीचा भाग समाजात जाऊन समाजमनाची दिशाभूल होत रहाते. जिहादी आतंकवादी त्यांची ओळख लपवण्यासाठी आणि हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी हिंदु नावे धारण करतात, तोच भाग बॉलीवूड करत आहे, म्हणजेच ‘आतंकवादी आणि बॉलीवूड या दोघांची मानसिकता एकच आहे’, असे लक्षात येते. आतंकवादी हिंदूंवर अत्याचार करतात, भारताची हानी करतात आणि बॉलीवूडमध्ये बसलेले त्यांचे रक्षणकर्ते त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालून वर या देशातील बहुसंख्य हिंदूंना, राष्ट्रप्रेमींना अपमानित करतात. त्यांच्या विरुद्ध वातावरणनिर्मिती करतात.
काही वर्षांपूर्वी भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात जातीद्वेष त्यामध्ये ब्राह्मणद्वेष वाढीस लागला. या ब्राह्मणद्वेषामुळे म्हणजेच हिंदु धर्म, वेद, कर्मकांडे यांना संरक्षित करणार्यांपासून अन्य समाजाची नाळ खंडित झाली. परिणामी अन्य हिंदु समाज त्यांच्याकडे संशयाने, द्वेषाने पाहू लागला. इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’, या कूटनीतीवर आधारित हा ब्राह्मणद्वेष होता. या ब्राह्मणद्वेषानंतर आता मुसलमान नावे पालटण्याचा, म्हणजे जिहादचाच प्रकार होत आहे. त्याला साम्यवाद्यांच्या भाषेत ‘वोकिझम’चे नवे स्वरूपही म्हणता येईल. ही एक प्रकारची विकृती आहे. त्यामुळे समाजाची अपरिमित हानी होणार आहे. ती रोखण्यासाठी परिनिरीक्षण मंडळ आणि सरकारसह सर्वच संबंधित यंत्रणांवर दबाव निर्माण करावा लागणार आहे. सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे. हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल !
चित्रपट, नाटके यांद्वारे हिंदूंचा होणारा अवमान आणि अपकीर्ती रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक ! |