…अन्यथा चारित्र्याची नीच पातळी जगभर पसरण्यास वेळ लागणार नाही !

संध्याकाळची वेळ होती. एक पालक भेटायला येणार होते; पण ते पोचले नव्हते. मी टेबलाजवळ बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचे ‘अरे संस्कार संस्कार’ हे पुस्तक वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिने तिच्या ‘स्मार्टफोन’वर एक व्हिडिओ (चलत्‌चित्र) मला दाखवला. त्यात तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात ‘बांगलादेशा’चा राष्ट्रध्वज आणि दोन्ही हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी विरासारखी तो नाचवत होता ! तो व्हिडिओ पाहून काही क्षण तर आपण नेमके काय पहात आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी ८ ते १० वेळा वारंवार पहात राहिलो. जल्लोष करणार्‍या त्या तरुणाच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो. साधारण २५ वर्षांचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ‘७६ वर्षे वयाच्या आपल्या (बांगलादेशाच्या) देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचे कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रे काढून घेऊन ती अत्यंत उन्मादाने ध्वनीचित्रकासमोर नाचवतो !’ तो व्हिडिओ पहातांना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होते अन् दुसर्‍या बाजूला विलक्षण संताप होत होता. त्याच ‘लिंक’वर आणखी छायाचित्रे दिसायला लागली. काही तरुण अत्यंत आनंदाने पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचे ब्लाऊज दाखवत होते…! विशेष म्हणजे यात बांगलादेशी तरुणीही सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना या कृत्याची किंचित्ही लाज वाटली नाही अन् त्यात काही गैर आहे, असेही वाटले नाही…!

१. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे काय होणार ?

बांगलादेशातील राजकीय धुमश्चक्री मी ‘इंटरनेट’वरून पहात होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेश यांचे निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होते. बांगलादेशातील उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला, तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार. ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांक नागरिक त्यांचे सामान उचलून बायका-पोरांसह जगभर निर्वासित म्हणून फिरणार’, हे सगळे कळत होते. बांगलादेशातील १ कोटी हिंदु रहिवासी नागरिक आता काय करतील ? हा प्रश्न गेल्या काही दिवसांत सहस्रो वेळा मनात येऊन गेला असेल; पण लेखात वर म्हटल्याप्रमाणे ती छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहिले अन् जाणवले की, या अल्पसंख्यांक हिंदूंमधील स्त्रिया आणि मुलींचे काय होईल ? ‘जीव वाचवायचा असेल, तर शीलाला तिलांजली द्या’, असा प्रकार चालू झाला, तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथे नग्नसत्य बनून उभी आहे. हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘रक्तलांच्छन’ हे पुस्तक तरुणांनी तर वाचावेच; पण त्याहीपेक्षा पालकांनीच ते वाचणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.

२. महिलांची जाहीर बिभत्स विटंबना ही आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसते ?

राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कटकारस्थाने असू शकतात, हे सगळे मान्य. देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणे आणि तिथे धुडगूस घालणे, फर्निचर पळवून नेणे, हे खरोखर चुकीचे असले, तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात ‘जनक्षोभ’ असे गोड नाव दिले. त्यामुळे त्यातील सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे; पण देशातील तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बिभत्स विटंबना करणे, हे आता काहीतरी भलतेच सांगू पहात आहे ! या तरुणांच्या आई, बहीण, आत्या, मावशी, मामी यांना हे छायाचित्र बघून काय वाटले असेल ? धर्म कुठलाही असो; पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीने जाहीर विटंबना करणे, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारे आहे ?

३. जनक्षोभाचा एक वेगळा पैलू, म्हणजे समाजमन संवेदनाशून्य करणे !

आपल्या देशात हे घडले असते आणि अशा तरुणांवर गुन्हा नोंद झाला असता, तर काय झाले असते ? सगळ्यात पहिले, म्हणजे घटना घडल्यानंतर ४-५ दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना ‘नराधम’ वगैरे म्हटले असते, दिवसरात्र महाचर्चांची गुर्‍हाळे चालवली गेली असती, १००-२०० सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी स्वाक्षर्‍यांची मोहीम केली असती आणि ८-१० नामांकित अधिवक्त्यांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून वेगळी सनसनाटी घटना घडेपर्यंत माध्यमांचा तोफखाना चालू राहिला असता. १५ दिवसांनी समाजच हा विषय विसरून गेला असता. आजवर हे असेच घडत आलेले आहे; पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेत आहे ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून चालू झालेले वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुद्धा पायदळी तुडवत सुटले आहे.

‘पद्धतशीर विसंवेदन’ नावाचे एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसे केले जाते, याचे हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणले जाते. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. ‘आता नैतिकता आणि चारित्र्य यांपेक्षा आमची भावना महत्त्वाची’, याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला, तर आश्चर्य वाटायला नको.

४. अश्लील विनोदाने समाजमन उथळ आणि आंबट होण्यामध्ये सिंहाचा वाटा

महाराष्ट्रात तर याचा प्रारंभ केव्हाच झाला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने ते आनंदाने स्वीकारले आहे. मराठी ‘कॉमेडी शो’ने (विनोदाच्या कार्यक्रमाने) या प्रकरणाचा शुभारंभ केव्हाच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे, हा तर उघड स्वैराचार चालला होता. ‘याला विनोद म्हणा’, असा आग्रह जर अभिनेते शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांसमोर धरला असता, तर ही माणसे झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्याने सांगायला नको. पुरुष कर्मचार्‍याने कार्यालयात परकर परिधान करून जाणे, स्त्रीला जाहीर मुलाखतीत ‘पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता’, असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरांत पोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे ‘थंडीत तुझी कोळंबी होते’, असे म्हणतो आणि मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेते प्रसाद ओक ‘वन्स मोअर’ (पुन्हा एकदा) देतात अन् मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका ‘स्टँडअप कॉमेडी शो’मध्ये अंकिता वालावलकर अश्लील विनोद करते. आता ‘विनोद असेच असतात’, असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल, तर ते स्वाभाविकच आहे; कारण विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येत आहे. ‘समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही, तर सिंहाचा वाटा आहे’, हे आपणच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

५. स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत यावर गप्प का ?

एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेध करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून अधिक धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालत आहोत, याचा विचार कुणी करायचा ?

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’ (संदर्भ : दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६)

(अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.), असे समर्थांनी म्हटलेले आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेले आहे ? आणि कशासाठी ?

६. नैतिकता संपत जाणे आणि सांस्कृतिक प्रदूषण वाढणे हे चिंतनीय !

आज बांगलादेशातील तरुण आंदोलकांनी चारित्र्याविषयी जी नीच पातळी गाठली आहे, तिचे लोण जगभर पसरणार नाही, याची कुणाला खात्री आहे ? राजकीय आणि वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात; पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. अभिनेत्री केतकी चितळेला महाराष्ट्रात ज्या भाषेत ‘ट्रोल’ केले गेले, त्यात हे नैतिकतेचे पारडे गंजून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसलेले आहे.

समाजातील तरुणवर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या २५ वर्षांपासून चालू आहे. त्या धगीचे चटके बसत असतांनाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचे वारे आणखी भर घालत सुटले आहे, हे काळजीचेच लक्षण आहे.

७. जर तरुणांना स्वैराचारापासून थांबवले नाही,  तर आपल्याला परिणाम भोगावे लागतील !

कुटुंबांचा स्वतःच्या घरातील तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का ? असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. घरातील मुले मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिले, हे सगळे खरे; पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचे काय ? असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुले कुठे जातात ?, काय करतात ?, कुणासह फिरतात ?, कुणाच्या सहवासात असतात ?, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे ?, या सगळ्यांचे उत्तरदायित्व नेमके कुणाचे आहे ? आपली मुले स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात ?, हे पालकांना ठाऊक असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरे समाजाने सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तीला, ऊर्जेला आता नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणे, ही केवळ आपलीच नव्हे, तर संपूर्ण जगाची आवश्यकता आहे. कुटुंबव्यवस्थेने तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवले नाही, तर आज बांगलादेशातील छायाचित्रे दिसत आहेत, उद्या आपलीही मुले त्याच गोष्टी करतांना दिसली, तर त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल !

आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक-सांस्कृतिक-नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणे, भावनांवर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळवणे आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थात फसू न देणे, ही कौशल्ये केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तरुण पिढीला अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या सगळ्याचे फार भीषण परिणाम सर्वांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल, असे वाटत नाही !

– श्री. मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक आणि प्रमुख, ‘आस्था काऊन्सेलिंग सेंटर’, पुणे.