विरोध करणारी महिला वाहक आणि ज्येष्ठ नागरिक यांना छेड काढणार्यांकडून मारहाण !
पुणे – ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ (पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित) मधून प्रवास करणार्या महाविद्यालयीन युवतीची दोघांनी छेड काढली. छेड काढल्यानंतर जाब विचारणार्या महिला वाहकासह प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करून दोघेजण पसार झाल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. पोलिसांकडून पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी युवतीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अन्य एका घटनेत रिक्शाचालकाने एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून रिक्शाचालक गोविंद नेनावत याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मुलगी रिक्शात एकटीच असल्याचे पाहून रिक्शाचालक नेनावत याने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ‘कोलकाता शहरात झालेल्या घटनेप्रमाणे अत्याचार करू’, अशी धमकी देऊन रिक्शाचालक पसार झाला. घाबरलेल्या मुलीने घरी पोचल्यानंतर या घटनेची माहिती आईला दिली. खराडी भागातही पी.एम्.पी.एम्.एल्. थांब्यावर थांबलेल्या युवतीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.
संपादकीय भूमिका‘चोराच्या उलट्या..’ या म्हणीप्रमाणे कृती करणारे गुन्हेगार कठोर शिक्षेस पात्र आहेत. दिवसाढवळ्या सर्वांसमोर मुलींची छेड काढली जाणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |