जुन्या वादविवादांचा आणि कलहांचा त्याग करा !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद

जुन्या वादविवादांचा आणि मुळातच मूर्खपणाच्या निरर्थक असणार्‍या गोष्टींवरून होणार्‍या जुन्या कलहांचा त्याग करा. गेल्या ६००-७०० वर्षांत झालेल्या अधःपतनाचा विचार करून पहा. या काळात शेकडो वडीलधारी माणसे वर्षानुवर्षे याच गोष्टींची चर्चा करत की, पेलाभर पाणी उजव्या हाताने प्यावे कि डाव्या हाताने ? हात ३ वेळा धुवावे कि ४ वेळा ? किंवा चुळा ५ वेळा भराव्यात कि ६ वेळा ? अशा निरर्थक प्रश्नांची चर्चा करण्यात स्वतःचे संपूर्ण आयुष्य घालवणार्‍या लोकांकडून आणि अशा निरर्थक विषयांवर अत्यंत विद्वत्तापूर्ण असे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहिणार्‍या पंडितांकडून तुम्ही कोणती अपेक्षा करू शकता ? आपला धर्म स्वयंपाकघरात शिरून तिथेच अडकून पडण्याचा धोका आहे. या वेळी आपल्यापैकी बहुतांश लोक वेदांतवादी, पुराणवादीही आणि तंत्रवादीही नाहीत. आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)