India – Ukraine Relations : भारतीय आस्‍थापनांना युक्रेनमध्‍ये व्‍यवसाय करण्‍याची अनुमती देऊ ! – राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की

युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोलोदिमिर झेलेंस्‍की

कीव (युक्रेन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्‍ट या दिवशी कीव येथे युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोलोदिमिर झेलेंस्‍की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy ) यांची भेट घेतली. या वेळी झेलेंस्‍की म्‍हणाले की, युक्रेन भारतात बनवलेली उत्‍पादने खरेदी करेल. भारतीय आस्‍थापनांना कीवमध्‍ये व्‍यवसायासाठी अनुमती देऊन भारताशी जोडण्‍यासही युक्रेन सिद्ध आहे. आमचीही आस्‍थापने भारतात स्‍थापन करण्‍याची आमची इच्‍छा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi)  यांनी युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांना भारत (India) भेटीचे निमंत्रण दिले आहे. याविषयी भारतीय पत्रकाराने विचारले असता झेलेंस्‍की म्‍हणाले की, मी भारताला भेट देण्‍याची योजना आखत आहे; कारण जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या देशाशी धोरणात्‍मक भागीदारी आणि वाटाघाटी करण्‍यास प्रारंभ करता, तेव्‍हा मला वाटते की, तुम्‍ही वेळ वाया घालवणे टाळावे. त्‍यामुळे मला वाटते की, आम्‍ही पुन्‍हा एकत्र येणे चांगले होईल. आपण भारतात भेटलो, तर मला आनंद होईल. मी तुमच्‍या मोठ्या आणि महान देशाबद्दल पुष्‍कळ वाचले आहे. तेे अतिशय मनोरंजक आहे; मात्र तुमचा देश पहाण्‍यासाठी मला वेळ मिळणार नाही. ही खेदाची गोष्‍ट आहे; कारण युद्धकाळात माझ्‍याकडे दुसरे काहीही पहाण्‍यासाठी वेळ नाही.