आदेश न पाळल्यास शिक्षा !
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून शरीयत कायदा लागू करण्यात आला आहे. महिलांना बुरखा घालण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे. आता तालिबान प्रशासनाच्या न्याय मंत्रालयाने या आठवड्यात औपचारिकपणे नैतिकता नियंत्रित करणार्या नियमांची एक लांबलचक सूची प्रसारित केली आहे. यामध्ये महिलांना त्यांचे चेहरे झाकणे आणि पुरुषांनी दाढी वाढवणे आवश्यक आहे.
न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तालिबानच्या सर्वोच्च आध्यात्मिक नेत्याने वर्ष २०२२ मध्ये आदेश प्रसारित करून हे नियम लागू केले होते. हे आता अधिकृतपणे कायदा म्हणून स्थापित झाले आहेत.
नवीन नियम काय आहेत ?
नियमांनुसार महिलांनी त्यांचे शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकणारा वेश परिधान करणे आवश्यक आहे. याखेरीज पुरुषांना दाढी वाढवावी लागेल आणि ते ती कापू शकत नाहीत. तो नमाज आणि धार्मिक कृती वगळू शकत नाही. नियम न पाळल्यास शिक्षाही आहे. यामध्ये मालमत्ता जप्त करणे, सार्वजनिक कारागृहात १ घंटा ते ३ दिवस डांबून ठेवणे आणि योग्य वाटणारी कोणतीही शिक्षा यांचा समावेश आहे. यातूनही आरोपी सुधारला नाही, तर त्याला न्यायालयात उभे केले जाईल.