संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची ग्रामस्थांची चेतावणी
वेंगुर्ला – शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बुधवार, २१ ऑगस्ट या दिवशी भरती झालेल्या एका युवतीला वापरण्याचा कालावधी (एक्सपायरी डेट) संपलेले सलाईन लावण्यात आले. त्यानंतर युवतीला त्रास होऊ लागला. याविषयी माहिती मिळाल्यानंतर शिरोडा सरपंच लतिका रेडकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकार्यांना खडसावले आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
सरकारी वापरासाठी अशी नोंद असलेल्या या सलाईनवर ‘मार्च २०२२’ असा उत्पादन केल्याचा दिनांक असून ‘फेब्रुवारी २०२४’पर्यंत वापरण्याच्या कालावधीची नोंद आहे. युवतीला लावलेले सलाईन कालावधी संपलेले असल्याचे युवतीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. ‘ज्या सरकारी रुग्णालयांवर गोरगरीब रुग्ण अवलंबून असतात, अशा रुग्णालयांमध्येच गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळले जाते’, असा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला. या वेळी रुग्णालयातील सर्व औषधसाठा तपासण्याची मागणी ग्रामस्थांनी केली, तसेच वरिष्ठांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांवर कारवाई करण्याविषयीचे लेखी आदेश दिले नाहीत, तर आंदोलन करू, अशी चेतावणी ग्रामस्थांनी या वेळी दिली.