राहुल गांधी यांना ४ ऑक्टोबरला न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

पुणे – राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी प्रविष्ट केला आहे. त्यावर राहुल गांधी यांना १९ ऑगस्ट या दिवशी न्यायालयामध्ये उपस्थित रहावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता; परंतु सुनावणी झाली नाही. पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. त्या दिवशी राहुल गांधी यांना न्यायालयामध्ये स्वत:चे म्हणणे मांडावे लागणार आहे.

लंडनमध्ये अनिवासी भारतियांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली होती. त्याविषयी सात्यकी सावरकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जैन यांच्या न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा प्रविष्ट केला होता. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून त्याचा अहवाल न्यायालयात प्रविष्ट करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांना दिला होता. पोलिसांकडून अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याविषयी न्यायालयाने नोटीसही बजावली होती.