हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२३ मध्ये आम्ही कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याचे नियोजन केले होते. तेव्हा आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. राजाराम कृष्णा परब

१. एका मूकबधीर मुलाने हिंदुत्वनिष्ठांच्या घरी जाण्यासाठी वाट दाखवणे आणि ‘देवच वाट दाखवण्यासाठी आला आहे’, असे वाटून भावजागृती होणे

‘आम्ही साळगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील एका हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्यासाठी गेलो. त्यांच्या घरी जाण्यासाठी शेतातून पायवाट होती. ‘त्यांच्याकडे नेमके कसे जायचे ?’, हे आमच्या लक्षात येत नव्हते. तेवढ्यात एका मुलाने आम्हाला वाट दाखवली आणि आम्ही त्यांच्या घरी पोचलो. आम्ही परत येतांना पुन्हा तोच मुलगा आम्हाला वाट दाखवण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या आईकडून ‘तो मुलगा मूकबधीर आहे’, असे आम्हाला समजले. त्या वेळी आमची भावजागृती झाली आणि ‘देवच वाट दाखवण्यासाठी आला आहे’, असे आम्हाला वाटले.

कु. पूजा धुरी

२. एका हिंदुत्वनिष्ठ सरपंचांना ‘राखी कोण बांधणार ?’, असे वाटणे आणि साधकांनी त्यांना राखी बांधल्यावर त्यांना आनंद होणे आणि ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होणे

एका हिंदुत्वनिष्ठ सरपंचांना राखी बांधण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांना राखी बांधत असतांना त्यांचा कंठ दाटून आला आणि ते म्हणाले, ‘‘प्रतिवर्षी माझी बहीण मला राखी बांधते. या वर्षी तिचे लग्न झाल्यामुळे आणि तिला सुटी नसल्याने ती रक्षाबंधनासाठी येऊ शकणार नाही. मला ‘राखी कोण बांधणार ?’, असा प्रश्न पडला होता. तुम्ही मला राखी बांधल्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला आनंद मिळाला.’’

आम्ही त्यांना राखी बांधण्यामागील शास्त्र सांगितले. तेव्हा त्यांना आनंद झाला. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. त्यांनी त्यांच्या भागात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करायला सांगितले.

३. आधुनिक वैद्यांना सनातनचा लघुग्रंथ भेट देणे आणि त्यांनी तो ग्रंथ लगेच वाचणे

आम्ही एका हिंदुत्वनिष्ठ असलेल्या आधुनिक वैद्यांकडे राखी बांधण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी आम्ही त्यांना सनातनचा ‘श्री गणेश अथर्वशीर्ष व संकटनाशनस्तोत्र (अर्थांसह)’ हा लघुग्रंथ भेट दिला. त्यांनी तो ग्रंथ लगेच वाचण्यास प्रारंभ केला. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला.’

– श्री. राजाराम कृष्णा परब आणि कु. पूजा धुरी, कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) (१८.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक