सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्रीमती उषा बडगुजर यांना जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जाण्याची ओढ लागणे

श्रीमती उषा बडगुजर

‘गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आहे’, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला गुरुमाऊलींच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली. ‘ब्रह्मोत्सव म्हणजे गुरुमाऊलींना हृदयमंदिरात साठवून ठेवण्याची सुवर्णसंधी आहे. गुरुमाऊलींचे रूप डोळ्यांत किती साठवून ठेवू !’, असे मला वाटत होते. अंतर्मनात गुरुदेवांविषयी ओढ वाढत होती. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ब्रह्मोत्सव अनुभवायला मिळणार होता. मी अंतर्मनातून गुरुमाऊलींचे पाद्यपूजन करत असतांना ‘त्यांच्या चरणांचा स्पर्श हृदयमंदिरात साठवून ठेवावा’, असा विचार देवानेच माझ्या मनात दिला. हा क्षण अनुभवण्यासाठी देवानेच माझ्या मनातील अयोग्य विचार, भीती आणि काळजी नष्ट केली.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सुवर्णरथात विराजमान असल्याचे दिसल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे

ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी गुरुदेवांच्या आगमनाची वाट पहात होते. मी डोळे बंद करून गुरुदेवांचे चरण धरले. त्यानंतर मी त्यांच्या चरणांवर दुधाचा अभिषेक केला. त्यांचे सुकोमल, गुलाबी आणि मऊ चरण मी मुलायम वस्त्राने पुसून माझ्या हृदयमंदिरात ठेवले. त्यानंतर मी डोळे उघडले. तेव्हा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सुवर्णरथात विराजमान झालेले दिसले. तेव्हा आकाशात सर्वत्र तांबडा रंग पसरला होता. ‘सुवर्णरथाभोवती चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवत होते. सूर्यदेवतेने सूर्यकिरण शांत केल्यामुळे थंडगार हवेची झुळूक येत होती. गुरुदेवांचे मनोहर रूप बघून मला पुष्कळ आनंद होत होता. त्यांचे हास्य बघून ‘जणू काही ते सर्व साधकांना चैतन्यकण प्रदान करत आहेत’, असे मला जाणवत होते.

‘गुरुमाऊलींनी साधकांना त्यांचे मनोहर रूप दाखवून आशीर्वादरूपी चैतन्य ग्रहण करायला दिले, त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६३, वय ६४ वर्षे), जळगाव (१४.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक