‘सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४२ वर्षे) साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा ऐकत असतांना माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. साधकांमधील स्वभावदोष आणि अहंचे पैलू
साधकांमध्ये ‘अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे, ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे, पूर्वग्रह असणे’ असे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही अल्प होतात.
२. सौ. सुप्रिया माथूर यांनी साधकांना दिलेले दृष्टीकोन
२ अ. साधकांनी घडलेल्या प्रसंगांचा प्रांजळपणे अभ्यास करून त्याविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्यासच स्वभावदोष दूर होण्यासाठी अचूक उपाययोजना सांगता येत असणे : साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका लपवणे अयोग्य आहे. साधकांचा चुका सांगतांना प्रतिमा जपण्याचा भाग होत असल्याने त्यांच्याकडून चुकांविषयी मनमोकळेपणाने सांगितले जात नाही. त्यांच्याकडून स्वभावदोषांविषयी ढोबळपणे (वरवरचे) सांगितले जाते. साधकांनी चुका प्रांजळपणे सांगितल्यासच त्यांच्यामधील स्वभावदोष दूर होण्यासाठी अचूक उपाययोजना सांगता येते.
साधकांनी प्रसंगाचा अभ्यास करून ‘प्रसंग घडला, त्या वेळी मनाची स्थिती काय होती’, हा विचार करून ‘चुका कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या’, हे शोधायला हवे. स्वभावदोषांच्या मुळाशी जाऊन प्रयत्न केल्यावरच ते दूर होतात. साधकांनी अंतर्मुखता वाढवायला हवी.
२ आ. साधकांनी त्यांच्यातील ‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू न्यून होण्यासाठी इतरांचे साहाय्य घ्यायला हवे. त्यांनी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करायला हवा.
२ इ. साधकांनी व्यष्टी साधनेच्या अंतर्गत सर्व सूत्रे, उदा. नामजप आणि प्रार्थना करणे, स्वयंसूचना सत्रे करणे, स्वतःवरील त्रासदायक आवरण काढणे, सारणीत चुका लिहिणे इत्यादी अधिकाधिक वेळा भावपूर्णरित्या आचरणात आणावीत.

२ ई. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवल्यास त्यांच्या मनाची ऊर्जा वाचून त्याचा त्यांना आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लाभ होत असणे : ‘साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका सारणीत लिहिल्यास त्यांचा चुकांचा अभ्यास होतो. साधकांनी चुकांचा अधिक अभ्यास केल्यास त्यांच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवली जाते. त्यामुळे साधकांमधील बहिर्मुखता अल्प होऊन त्यांची अंतर्मुखता वाढते. साधकांनी चुका लिहिल्याने त्यांच्यामधील ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची तीव्रता न्यून होते. त्यामुळे साधकांना साधनेत पुढे जायला साहाय्य होते. साधकांमधील ‘स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू’ न्यून झाल्याने त्यांच्या मनाची ऊर्जा वाचून त्याचा साधकांना आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लाभ होतो.
२ उ. साधकांना स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्वयंसूचना देणे, शिक्षापद्धत अवलंबून स्वतःला चिमटा काढणे, असे प्रयत्न करायला हवेत.
२ ऊ. साधकांमधील ‘स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू’ यांचे निर्मूलन झाल्याने त्यांच्यामधील सत्त्वगुणात वृद्धी होत असणे : साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे निर्मूलन झाल्याने त्यांचे मन आणि बुद्धी यांवरील नकारात्मक ऊर्जेचे आवरण, तसेच त्यांच्यामधील रज-तम न्यून होऊन त्यांची सात्त्विकता वाढते. साधकांमधील सत्त्वगुण वाढल्याने त्यांची भावजागृती होऊ लागते. साधकांकडून मनाचा अभ्यास चांगला होतो. साधकांमधील तळमळ वाढल्याने त्यांच्यावर देवाची कृपा होऊ लागते. साधकांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेली सूत्रे एकाग्रतेने आणि मनापासून ऐकली, तर त्यांच्याकडून योग्य दिशेने चांगल्या प्रकारे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे साधकांमध्ये लवकर पालट होतो.
२ ए. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने केली नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होते.’
सौ. सुप्रियाताईंच्या सत्संगांच्या माध्यमातून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) महत्त्वाची सूत्रे माझ्या लक्षात आणून देऊन मला शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी गुरुदेव आणि सौ. सुप्रियाताई यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१.२०२५)