Mr Thanedar : बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंना न्‍याय मिळेपर्यंत थांबणार नाही ! – खासदार श्री ठाणेदार, अमेरिका

भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार श्री ठाणेदार यांचा निर्धार

खासदार श्री ठाणेदार

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंना न्‍याय मिळवून देईपर्यंत मी थांबणार नाही, असा निर्धार अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदु खासदार श्री. ठाणेदार यांनी व्‍यक्‍त केला. त्‍यांनी यासंदर्भात त्‍यांचा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे.

या व्‍हिडिओमध्‍ये ते म्‍हणतात की, बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंना न्‍याय हवा आहे. त्‍यांच्‍याविषयी अन्‍यायाची वृत्ते वाचून मन हेलावून जाते. हे सर्व थांबले पाहिजे आणि मी त्‍यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी सिद्ध आहे. तेथील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील आक्रमणे पूर्णपणे अस्‍वीकारार्ह आहेत. मी अमेरिकेचा परराष्‍ट्र विभाग आणि जगभरातील अधिकाी यांच्‍या संपर्कात आहे. या सर्व गोष्‍टींचे निराकरण होईपर्यंत आम्‍ही थांबणार नाही.

गेल्‍या वर्षी ठाणेदार यांनी अमेरिका आणि जगातील इतर भागांत हिंदू अन् इतर धार्मिक अल्‍पसंख्‍य यांच्‍यावरील अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवण्‍यासाठी हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन अमेरिकी काँग्रेस ‘कॉकस’ची (एकाच उद्देशाने कार्यरत गटाची) स्‍थापना केली. त्‍या वेळी ठाणेदार म्‍हणाले होते की, विविध देशांतील हिंदु अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य करून आक्रमणे होत असल्‍याच्‍या बातम्‍यांमुळे मी विशेषतः चिंतेत आहे. हिंदूंनी मंदिरे आणि घरे फोडणे, त्‍यांना लक्ष्य करणे या घटना जितक्‍या निषेधार्ह आहेत, तितक्‍याच त्रासदायक आहेत.

संपादकीय भूमिका

भारतातील हिंदुत्‍वनिष्‍ठ खासदार आणि आमदार यांनी असा निर्धार कधीतरी व्‍यक्‍त केला आहे का ? हिंदूंसाठी कुणीच वाली उरलेला नाही, हेच भारताच्‍या अशा हीन-दीन स्‍थितीतून लक्षात येते, नाही का ?