मुंबई – मुंबई तुंबवणार्या प्लास्टिक वापराचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची कार्यवाही करतांना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो. जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत केलेल्या कारवाईतून तब्बल १ सहस्र किलोंपेक्षा जास्त प्लास्टिक विविध ठिकाणांहून जप्त केले आहे, तसेच २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल केली आहे. या कारवाईत सर्वाधिक प्लास्टिक मुलुंड, घाटकोपर, सँडहर्स्ट रोड, मशीद रोड, अंधेरी या भागांत आढळले आहे.
मुंबईत २६ जुलै, २००५ या दिवशी आलेल्या महापुराला नाल्यात साठलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक दुकानांना भेट देतांनाच बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंड करू लागले. ही कारवाई सातत्याने चालू असली तरीही प्लास्टिक वापराला पूर्णपणे आळा बसलेला नाही.
महापालिकेने १ जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत प्लास्टिकविरोधी कारवाईत १ सहस्र ६६ किलो प्लास्टिक जप्त केले. ४०६ जणांविरोधात ही कारवाई करतांना २० लाख ६० सहस्र रुपये दंड वसूल केला आहे. १९ सहस्र ४१३ ठिकाणी भेटी दिल्यानंतर ४०६ खटलेही टाकले आहेत. एकट्या जुलै मध्ये ६१२ किलोचे प्लास्टिक जप्त केले आहे. या महिन्यात १३ लाख ४५ सहस्र रुपये दंड वसूल केला.