१. प्राचीन भारताच्या इतिहासात मंदिरांचे महत्त्व
‘भारत हा एक असा देश आहे, जेथील भूमी विविध संस्कृती आणि चालीरीती यांनी पोषित असून बहरलेली आहे. त्याचा मुख्य मानबिंदू या देशाची जीवनशैली आणि येथील धर्म आहे. भारताच्या प्राचीन आणि उच्च कोटीच्या परंपरेतील सर्व घटकांमध्ये धर्माचा समन्वय अन् धर्माचरणाची एक तपशीलवार व्याख्या दिली आहे. व्यापार आणि अर्थव्यवस्था यांतही धर्म हे महत्त्वाचे सूत्र राहिले आहे. उदाहरणार्थ भारतातील धर्म आणि संस्कृती यांचा प्रसार-प्रचार करण्यात धार्मिक स्थळांची विशेष भूमिका राहिली आहे. मध्ययुगीन काळात अझरबैजान, रशिया इत्यादी देशांमध्ये प्रामुख्याने व्यापार्यांनी धार्मिक स्थळे बांधली होती. त्यामुळे प्रवासींचा व्यवसाय चालू झाला आणि त्या प्रदेशात संस्कृतीचाही प्रसार झाला. भारतीय व्यापारी देशी वस्तूंसमवेत ते त्यांची जीवनशैलीही घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी तेथे मंदिरे बांधली, जी इतिहासात नोंदली गेली असून त्यांची मुळे आजही भारताशी जोडून आहेत.
प्राचीन भारताच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदिरे ही केवळ तीर्थक्षेत्रे नव्हती, तर एक सामुदायिक ठिकाणेही होती, असे स्पष्ट होते. दक्षिण भारतात अनेक तालुक्यांच्या बांधणीत मध्यभागी मंदिराची स्थापना करण्यात येत होती. त्यानंतर निवासी आणि व्यापारी क्षेत्र यांची स्थापना करण्यात येत होती. त्याचा अस्सल उल्लेख तमिळनाडूचे बृहदेश्वर मंदिर आणि भोपाळच्या कुदिसी मशिदीच्या जागी बांधलेल्या मंदिरांच्या शिलालेखांमध्ये आढळून येतो. मंदिर परिसरात शिक्षण, आरोग्य सेवा, भोजन व्यवस्था, वसतीगृह, विश्रांती यांची व्यवस्था होती. पैसे ठेव आणि कर्ज यांच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यामुळे मंदिरे ही तीर्थक्षेत्र असण्यासमवेतच लोककल्याण आणि विशिष्ट क्षेत्राची अर्थव्यवस्था यांची केंद्र होती. प्राचीन भारतात याच तीर्थक्षेत्रातून धनलाभ होत होता. प्रत्येक मंदिरातील आकर्षक कलाकुसर, भव्यता आणि अलौकिक मूर्ती यांमुळे ते आध्यात्मिक क्षेत्र, तसेच पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय होते. ही व्यवस्था संपूर्ण भारतभर अस्तित्वात होती.
२. मंदिरांचे भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान
आताचा नवीन भारतही या मंदिरांच्या माध्यमातून उभारलेल्या अर्थव्यवस्थेला देशव्यापी आणि जागतिक पातळीवर घेऊन जात आहे. जेथे जेथे मंदिरे आहेत, तिथे आपोआप विकासाची कामे होत आहेत. मंदिरांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था सुधारण्याच्या धोरणाला ‘टेम्पल इकॉनॉमी’ (मंदिर अर्थव्यवस्था) म्हणतात. आज या मंदिर अर्थव्यवस्थेमुळे भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढत आहे. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस’ (‘एन्.एस्.ओ.’च्या – राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या) संशोधनानुसार आज राष्ट्रीय स्तरावर ही मंदिर अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेत ३.२ लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहे, तसेच भारताच्या ‘जीडीपी’मध्ये २.३२ टक्के योगदान देते. ‘एन्.एस्.ओ’च्या संशोधनात असे दिसून आले आहे की, भारतातील मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे यांना भेट देणारे पर्यटक किंवा भाविक यांपैकी ८७ टक्के भारतीय असून १३ टक्के विदेशात रहाणारे भारतीय आहेत. धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून प्रतिवर्षी ४ लाख ७४ सहस्र कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.
वर्ष २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारला मंदिरांमधून १९ लाख ३४ सहस्र ७०६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. २० लाखांहून अधिक मंदिरे असलेल्या भारतात ८ कोटी लोक पर्यटन आणि प्रवास उद्योगांशी संबंधित आहेत. त्यामुळेच आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही या मंदिराची अर्थव्यवस्था सबळ करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. अयोध्येतील श्रीराममंदिर, महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासाठी ‘महाकाल लोक’, काशीविश्वेश्वरसाठी ‘काशी कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) यांचा जीर्णोद्धार, तसेच केदारनाथमधील ‘शंकराचार्य स्थळ’, ओंकारेश्वरमधील ‘एकात्म धाम’, काश्मीरमधील शारदा पीठाचा जीर्णोद्धार, उत्तराखंडमधील ‘कैलास दर्शन’ आदी कामे या अंतर्गत करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्थेने केलेली ही प्रशंसनीय कामे आहेत. त्यातून राज्याला आर्थिक लाभ होत आहे, तसेच या क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगार यांच्या शक्यताही वाढल्या आहेत.
३. मंदिर अर्थव्यवस्थेमुळे भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल
मंदिरे ही केवळ श्रद्धेची केंद्रे मानली जायची; पण ती कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचे माध्यम बनली आहेत. मंदिरे ही फुले, तेल, कापड, सुगंधी द्रव्ये इत्यादींसारख्या लघु उद्योगांना चालना देतात, तसेच प्रवास (वाहतूक आणि प्रवास), विश्रामगृहे (हॉटेल्स), औषधे इत्यादी क्षेत्रांतही प्रगती होते. जेथे मंदिरे आहेत, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील भूमीचे मूल्य वाढते. त्यामुळे भूमीचा व्यवसायही वाढतो. मंदिरांच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि शिक्षण यांचे जतन अन् संवर्धन यांचे मार्गही खुले होतात, जो स्वतःच एक उत्कृष्ट व्यवसाय आहे.
आज संपूर्ण जगाला मंदिराच्या अर्थव्यवस्थेची जाणीव झाली आहे आणि जागतिक स्तरावर होत असलेले मंदिर बांधकाम हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. इंडोनेशिया, थायलंड, लाओस इत्यादी देश पर्यटन स्थळे म्हणून ‘भारतीय संस्कृतीचे प्रतीक’ असलेली भव्य मंदिरे उभारून त्यांच्या अर्थव्यवस्थेत काही अंशी हातभार लावत आहेत. येत्या काही वर्षांत संयुक्त अमिराती, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांनीही भारताचे अनुकरण करत मंदिरांची उभारणी केली आहे. त्यांचे पाहून अन्य देशही त्याच रांगेत पुढे जात आहेत.
मंदिरे ही आध्यात्मिक ऊर्जेची केंद्रे आहेत. त्यांना पर्यटन केंद्र समजून आपण अर्थव्यवस्थेत सुधारणा करत असतांनाच त्या तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या समाजात वैभवशाली संस्कृती आणि मूल्ये यांची बीजेही अंकुरित करतो. आज भारत पुढे जात आहे, भारतीयत्वाचा आणि धर्माचा प्रसार होत आहे, जग सनातनमय होत आहे अन् आत्मभावना जागृत होत आहे. याचे मुख्य कारण, म्हणजे संस्कृतीचे मानबिंदू असलेली मंदिरे आणि त्यांच्या माध्यमातून होणारा धार्मिक, सामाजिक अन् आर्थिक विकास हे आहे.
मंदिर अर्थव्यवस्थेमध्ये भारत ज्या प्रकारे प्रगती करत आहे, ते पहाता भारताच्या ‘जीडीपी’मध्ये मंदिरे एक प्रमुख क्षेत्र बनू शकतात. जागतिक स्तरावर तेल, शस्त्रास्त्रे आणि आरोग्य सेवा यांच्याभोवती फिरणारी आर्थिक व्यवस्थेची धुरा अमानवी मानसिकतेचा त्याग करून मंदिरांची उभारणी, धार्मिक शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार यांची व्यवस्थांची निर्मिती अन् त्यांच्या माध्यमातून पैसा कमावण्याकडे वळू शकेल. त्यातून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) कल्पना रुजेल आणि संपूर्ण जग आपल्या हिंदु धर्माचे पालन करू लागेल. ही मंदिर अर्थव्यवस्थाच भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी उत्प्रेरक सिद्ध होईल आणि भारताला जागतिक मंचावर सर्व व्यवस्थांच्या केंद्रस्थानी स्थापित करील.’
– अथर्व पवार, विश्व संवाद केंद्र
(साभार : ‘इंडिया स्पीकस् डेली’चे संकेतस्थळ)
संपादकीय भूमिकामंदिर अर्थव्यवस्था भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी प्रेरक होईल; पण त्यासाठी ती सरकारच्या नव्हे, तर भक्तांच्या स्वाधीन हवीत ! |