आनंदी स्वभावाचा आणि हिंदु धर्मातील कृतींचे आवडीने पालन करणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा (गोवा) येथील कु. देवांश वसंत सणस (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवांश सणस हा या पिढीतील एक आहे !

काल, म्हणजे श्रावण शुक्ल द्वितीया (६.८.२०२४) या दिवशी कु. देवांश सणस याचा आठवा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली देवांशची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. देवांश सणस
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. स्वाती सणस

१. सौ. स्वाती सणस (कु. देवांशची आई)

१ अ. नीटनेटकेपणा : ‘देवांश त्याच्या सर्व वस्तू नीट सांभाळून आणि जागच्या जागी ठेवतो. त्याच्या शाळेचे दप्तर, कंपासपेटी हे सर्व पद्धतशीरपणे, सुटसुटीत आणि नीटनेटकेपणाने ठेवलेले असते. त्याचे कपड्यांचे कपाटही व्यवस्थित लावलेले असते.

१ आ. आनंदी स्वभाव : ‘देवांश नेहमी आनंदी असतो. त्याचे खेळणे, बोलणे, घरात असणे, त्याचे साधनेविषयीचे दृष्टीकोन इत्यादी नेहमी ऐकावेसे वाटतात. त्याचा सहवास नेहमी आनंददायी वाटतो.

१ इ. हिंदु धर्मातील कृतींचे आवडीने पालन करणे : देवांशला त्याच्या बाबांनी किंवा इतर कोणी हिंदु धर्मातील कृतींविषयी सांगितले की, तो लगेच त्याचे काटेकोरपणे पालन करतो, उदा. प्रतिदिन कपाळावर टिळा लावणे, देवापुढे दिवा लावणे, वास्तुशुद्धी करणे, नियमित प्रार्थना करणे इत्यादी.

१ ई. झाडांविषयी संवेदनशीलता

१ ई १. तुळशीची पाने तोडतांना देवांशने तुळशीला प्रार्थना करून तिची क्षमा मागणे आणि आईलाही असे करण्याची जाणीव करून देणे : मी एकदा स्वयंपाकघरात काढा बनवत होते. त्यासाठी मला तुळशीची पाने हवी होती; म्हणून मी देवांशला थोडी तुळशीची पाने आणायला सांगितले. तो तुळशीची पाने घेऊन आला; मात्र त्याला स्वयंपाकघराच्या ओट्यावर आधीच आणून ठेवलेली तुळशीची पाने दिसली. तेव्हा त्याने मला विचारले, ‘‘आई, ही तुळशीमातेची पाने कोणी तोडून आणली ?’’ मी त्याला मीच पाने आणल्याचे सांगितले. तेव्हा त्याने मला विचारले, ‘‘आई, मग तू तुळशीमातेला क्षमायाचना केलीस का ? तिला ‘मी पाने तोडू शकते का ?’, असे विचारलेस का ? तिची अनुमती घेतलीस का ? तिची क्षमा मागितलीस का ?’’ मी तसे काहीच न केल्याचे देवांशला सांगितले. ‘असे काही करायचे असते’, हे एवढी वर्षे माझ्या लक्षातच आले नव्हते.

१ ई २. बालसाधकाने रात्री झाडांना पाणी घातल्यावर ‘आता झाडे निद्रिस्त असल्याने त्यांना पाणी घातल्यास त्यांची झोपमोड होते’, असे देवांशने त्याला सांगणे आणि स्वतः झाडांची क्षमा मागून बालसाधकालाही क्षमा मागण्यास लावणे : एकदा आश्रमातील एका साधकाने देवांशला सांगितले, ‘‘रात्री झाडे झोपतात; म्हणून त्यांना सूर्यास्तानंतर पाणी घालायचे नाही.’’ एकदा रात्रीच्या वेळी एका बालसाधकाने त्याच्याकडील बाटलीत असलेले पाणी झाडांना घातले. त्या वेळी देवांशला पुष्कळ वाईट वाटले, ‘रात्रीच्या वेळी झाडे झोपतात, तर त्या झाडांची आता झोपमोड झाली असेल, त्यांना त्रास झाला असेल’, असे त्याला वाटत होते. नंतर देवांशने त्या बालसाधकाला ‘रात्री झाडांना पाणी का घालू नये ? आणि त्यामुळे काय परिणाम होतात ?’ हे समजावून सांगितले. त्याने स्वतः झाडांची क्षमा मागितली आणि त्या बालसाधकाकडूनही क्षमायाचना करून घेतली.

१ उ. साधनेची आवड

१ उ १. स्वतः होऊन साधनेचे सर्व प्रयत्न करणे : देवांशला पहिल्यापासून साधनेची आवड आहे. तो जसजसा मोठा होत आहे, तशी त्याची साधनेची आवडही वाढत आहे. वर्ष २०२२ ते २०२४ या काळात आम्ही मुंबईत होतो. तेव्हा देवांश साधनेचे पुढील सर्व प्रयत्न करत असे. नामजप करणे, गुरुदेवांना प्रार्थना करणे, तसेच कृतज्ञता व्यक्त करणे, स्वतःच्या चुका सांगणे, चुकांवर योग्य प्रायश्चित्त घेऊन त्याचे पालन करणे, इतरांनाही त्यांच्या चुका सांगणे इत्यादी. आता सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्यावरही तो नामजप करणे, फलकावर चूक लिहिणे, सेवेत साहाय्य करणे इत्यादी प्रयत्न करतो.

१ उ २. साधनेसाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला सिद्ध असलेला देवांश ! : आम्ही एप्रिल २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथे रहायला आलो. त्यापूर्वी २ वर्षे आम्ही मुंबईत रहात होतो. तेथील आमच्या वसाहतीमध्ये पोहण्याचा लहान तलाव, मोठी बाग आणि खेळाचे मैदान, अशा अनेक सुखसुविधा होत्या; परंतु देवांशला तेथे रहायला आवडायचे नाही. त्याचे मन तेथे रमत नव्हते. त्याला रामनाथी आश्रमात यायचे होते आणि त्यासाठी तो कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला सिद्ध होता. देवांशला त्याच्या बाबांनी सांगितले, ‘‘रामनाथी आश्रमात दूरचित्रवाणी संच नसेल. तुला त्यावरील कार्यक्रम पहाता येणार नाहीत. साधनेसाठी त्यांचा त्याग करावा लागेल !’’ देवांश लगेच सिद्ध झाला आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता बाबांना सांगितले, ‘‘इथून पुढे आपल्यासाठी दूरचित्रवाणी संच नसला, तरीही चालेल !’’ यावरून ‘साधनेसाठी देवांश कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला सिद्ध आहे’, हे लक्षात येते.

१ उ ३. चूक झाल्यावर देवांशला खंत वाटणे : देवांश नेहमी सकारात्मक राहून त्याच्या चुका स्वीकारतो. चुका स्वीकारून तो त्यांचे चिंतन करतो आणि प्रायश्चित्तही घेतो. ते प्रायश्चित्त तो वेळच्या वेळी पूर्ण करतो. चूक झाल्यावर त्याला पुष्कळ खंत वाटत असते. तो लगेच स्वतःचे कान पकडून देवाची आणि गुरुदेवांची क्षमायाचना करतो.

१ उ ३. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे गांभीर्य : देवांश रात्री झोपतांना नियमित नामजप लावून झोपतो. तो सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे छायाचित्र त्याच्या उशीखाली घेऊन झोपतो. अंथरुणाभोवती नामपट्ट्यांचे मंडल करतो. देवांश झोपताना न चुकता हे सर्व आध्यात्मिक उपाय करतो.

१ ऊ. घरी वाढदिवस न करता ‘मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे, आश्रमात जाऊन नामजप करणे आणि तेथे वाढदिवस साजरा करणे’, अशा प्रकारे वाढदिवस करण्यास देवांशने त्वरित सिद्ध होणे : पूर्वी आम्ही देवांशचा वाढदिवस घरी लहान स्वरूपात साजरा करायचो; परंतु या वर्षी देवांशला त्याच्या बाबांनी सांगितले, ‘‘या वर्षीपासून आपण तुझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत जाऊ. आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे, आश्रमात जाऊन साधना करणे, आश्रमात वाढदिवस साजरा करणे, अशा प्रकारे तो साजरा करूया. वसाहतीतील मुलांना किंवा इतर मुलांना बोलावून वाढदिवस साजरा करायचा नाही.’’ देवांशने हे लगेच स्वीकारले. तो म्हणाला, ‘‘वाढदिवसाच्या दिवशी मंदिरात आणि आश्रमातील ध्यानमंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतल्याने मला त्यांचा आणि गुरुदेवांचा विशेष आशीर्वाद मिळेल. घरात वाढदिवस साजरा करून मुलांना बोलावल्याने मला कोणता लाभ मिळणार ? त्यापेक्षा आपण बाबांनी सांगितल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करूया.’’

देवांशचे हे बोलणे ऐकून देवांशमध्ये असलेले ‘सकारात्मक’ आणि ‘परिस्थिती लगेच स्वीकारणे’, हे गुण माझ्या लक्षात आले.

१ ए. अनुभूती – पुष्कळ रुग्णाईत असलेल्या देवांशने स्वतःजवळ नामजप लावण्यास सांगणे, तसेच श्रीकृष्णाचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे छायाचित्र जवळ ठेवणे, यामुळे तो शीघ्रतेने बरा होणे : मुंबईत असतांना एकदा देवांश पुष्कळ रुग्णाईत होता. त्याला पुष्कळ ताप आला असल्याने अशक्तपणा आला होता. चालताही येत नव्हते. सर्दी आणि खोकला यांमुळे श्वास नीट घेता येत नव्हता. अशा स्थितीत देवांशला त्याच्याजवळ सतत नामजप लावून ठेवायला हवा होता. त्याला ‘मी त्याच्याजवळ बसून रहावे’, असे वाटत होते. मी त्याच्या जवळून दूर गेल्यावर तो गुरुदेवांचे छायाचित्र किंवा श्रीकृष्णाचे चित्र उश्याजवळ किंवा हातात घेऊन झोपण्याचा प्रयत्न करायचा. तो एक मिनिटही ते दूर करत नव्हता. त्यामुळे ‘देव सतत त्याच्याजवळ आहे’, असे आम्हाला वाटायचे. देवांशची स्थिती पुष्कळ खालावलेली असूनही त्याच्या रक्ताच्या चाचणीतून काहीही निष्पन्न झाले नाही. तो ४ – ५ दिवसांतच बरा झाला.

१ ऐ. प्रशिक्षणवर्गात देवांशने क्षात्रतेज असल्याप्रमाणे लाठी चालवणे : वर्ष २०२३ मध्ये मुंबईत असतांना देवांश लाठीकाठी शिकण्याच्या प्रशिक्षण वर्गाला जात असे. त्या वेळी विविध ऐतिहासिक प्रसंग त्याला त्याच्या वडिलांनी क्षात्रतेजाचे महत्त्व सांगितले होते. तेव्हापासून प्रत्येक प्रशिक्षणवर्गाला जातांना तो कपाळावर टिळा लावून, प्रार्थना करून आणि जयघोष करत जात असे. त्या वेळी ‘त्याची क्षात्रवृत्ती अधिकच जागृत झाली आहे’, असे आम्हाला वाटायचे. प्रशिक्षण देणारे शिक्षकही आम्हाला म्हणाले, ‘‘देवांश अल्प वेळेत पुष्कळ चांगल्या प्रकारे लाठी चालवत आहे. तो क्षात्रतेज असल्याप्रमाणे लाठी चालवतो.’’

२. श्री. वसंत सणस (देवांशचे बाबा)

श्री. वसंत सणस

२ अ. देवांशने ‘हलाल’ (टीप) या विषयाचा अभ्यास करून इतरांना सांगणे आणि स्वतः वस्तू घेतांनाही जागरूक रहाणे

१. ‘वर्ष २०२३ मध्ये मुंबईला असतांना देवांश माझ्यासमवेत ‘हलाल’ या विषयावरील आंदोलनासाठी काही वेळा येत असे. नंतर देवांशने तो विषय नीट समजून घेतला आणि त्याविषयी शाळेतील मित्र, वसाहतीतील मुले, तसेच नातेवाईक यांनाही ‘हलाल’ विषय समजून सांगितला. आता तो दुकानातून अगदी लहानशी वस्तू घेतांनासुद्धा तो त्यावरील सर्व माहिती नीट पाहून ‘ती वस्तू हलाल प्रमाणित नाही ना ?’, असे पाहून मगच घेतो.

टीप : ‘हलाल’ म्हणजे इस्लामनुसार जे वैध आहे, ते.

२. एकदा त्याच्या वर्गातील एका मुलाचा वाढदिवस होता. त्या मुलाने वर्गातील सर्व मुलांना चॉकलेट आणि कॅडबरी वाटल्या. देवांशने ते चॉकलेट आणि कॅडबरी नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्यावर त्यावर ‘हलाल’चा ‘स्टॅम्प’ आहे. त्यानंतर देवांशने ती चॉकलेट्स वर्ग शिक्षकांकडे दिली.

३. देवांशला मुंबईत ज्या ज्या ठिकाणी हलाल प्रमाणित वस्तूंची दुकाने दिसत असत, त्या त्या प्रत्येक ठिकाणी देवांश मला सांगत असे की, आपण या ठिकाणी आंदोलन करूया.’

‘हे गुरुमाऊली, तुम्हीच देवांशला साधनेसाठी अधिकाधिक बळ द्या. त्याच्याकडून साधना करून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’ (२७.७.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.