रत्नागिरी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – भारतातील आणि विदेशातील देश अन् हिंदुत्व विरोधी शक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेला धोका रोखणे, हिंदूंच्या समस्यांची त्वरित दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी दबाव गटाची निर्मिती करणे, हिंदूंची इकोसिस्टीम (यंत्रणा) तयार करणे आदी उद्देशाने येथे ३ ऑगस्ट २०२४ या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, मंदिर विश्वस्त, मंडळांचे पदाधिकारी, अधिवक्ता आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या सहभागाने आणि संतांच्या वंदनीय उपस्थितीत रत्नागिरी विभाग ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली. ही समिती रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांसाठी कार्यरत असेल.
समितीच्या स्थापनेमागचा उद्देश सांगताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर म्हणाले की, आज राजकारण, सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना, बॉलिवूड, पत्रकारिता, साहित्य अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित असलेले जिहादी, मिशनरी, कम्युनिस्ट, ‘सेक्युलॅरिस्ट’, अर्बन नक्षलवादी, खलिस्तानी इत्यादी भारताबरोबरच परदेशातील देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी शक्ती यांची ‘इकोसिस्टीम’ परकीय शक्तींच्या साहाय्याने कार्यरत आहे. हिंदूंनी अशाच धोरणात्मक संघटनेची निर्मिती आणि नियोजन करून हिंदुद्वेषी शक्तींची ही ‘इकोसिस्टीम’ थांबवणे आवश्यक आहे. सत्ताधारी आणि हिंदु जनता यांच्यात संवाद प्रस्थापित करणारी यंत्रणा असणे, तसेच हिंदूंच्या समस्यांची त्वरित दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी हिंदूंचा ‘दबाव गट’ तयार करणेही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ आदींनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र समन्वय समिती स्थापन करणे ही आजची आवश्यकता आहे.
कोणत्याही चळवळीच्या यशस्वीतेसाठी भगवंताचे अधिष्ठान आवश्यक !- सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।। , या समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल, तर त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हवे. ते प्राप्त करण्यासाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने साधना करणे आवश्यक आहे. कुलदेवता आणि श्री दत्त यांच्या नामस्मरणाने आध्यात्मिक प्रगतीला प्रारंभ होतो. आपत्काकाळात तरून जाण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे.
राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे !- अधिवक्ता सौ. कावेरी राणे, हिंदु विधीज्ञ परिषद, सिंधुदुर्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अधिवक्त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला; म्हणून भारत स्वतंत्र झाला. सद्य:स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांची केविलवाणी स्थिती पहाता अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यामध्ये जिथे कायदेविषयक साहाय्य आवश्यक असेल, ते आम्ही निश्चित प्रदान करू.
विशेष :
१. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख श्री. गणेश गायकवाड; विश्व हिंदु परिषदेचे ह.भ.प. दादा रणदिवे, लांजा; श्री महापुरुष देवस्थान, कोकण नगर, श्री. प्रसन्न बिर्जे; श्री मरुधर विष्णु समाजाचे श्री. दीपक देवल; श्री. विराम चौधरी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी विभाग समन्वयक श्री. सुनील सहस्रबुद्धे; गणपतीपुळेचे माजी सरपंच श्री. महेश केदार; माजी नगरसेवक श्री. महेंद्र साळवी; कुवारबाव व्यापारी संघाचे सचिव श्री. प्रभाकर खानविलकर; रा.स्व. संघाचे श्री. प्रदीप दांडेकर; रत्नदर्पण न्यूजचे संपादक श्री. योगेश हळदवणेकर, अमितराज खटावकर, ओमकार मित्र मंडळ राजापूरचे अध्यक्ष श्री. विवेक गुरव, देवरुख येथील श्री. उदय मुळ्ये आदींनी स्वतःचे विचार व्यक्त केले.
२. मान्यवरांच्या प्रबोधनानंतर आणि उपस्थित सर्वांच्या अनुमतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी रत्नागिरी विभाग ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना झाल्याचे घोषित केले.
३. उरण येथे कु. यशश्री शिंदे हिच्या लव्ह जिहाद्याकडून झालेल्या निर्घृण हत्त्येच्या विरोधात रत्नागिरी येथे ६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता जयस्तंभ, रत्नागिरी येथे आंदोलन घेण्याचे ठरवण्यात आले.
या वेळी श्री महाकाली देवस्थान, आडिवरेचे श्री. स्वप्निल भिडे; श्री सांब देवस्थान, पेठ किल्ल्याचे श्री. रमेश सुर्वे; श्री देव सोमेश्वर सूंकाई ट्रस्ट, पिरंदवणेचे श्री. सुनीत भावे; शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर; आम्ही शिवभक्त संघटनेचे श्री. ऋषिकेश पाष्टे; राजस्थान क्षत्रिय संघ रत्नागिरीचे श्री. रविंद्रसिंह राणावत; श्री. संताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेचे श्री. संदीप नाचणकर; गो सेवा संघाचे सचिव श्री. सुशील कदम; श्री चंडिका मंदिर, गणपतीपुळेचे सचिव श्री. विनोद माने; सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये, सौ. मधुरा खेराडे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर, श्री. राजेंद्र पाटील, श्री. तन्मय जाधव आदी उपस्थित होते.