‘मी एक सामान्य साधक असूनही परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला अनेकदा विविध देवता आणि संत यांचे दिव्य दर्शन झाले. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची महानता अखिल मानवजातीला कळावी, तसेच बुद्धीवादी आणि तर्कवादी लोकांना ‘ईश्वर ही केवळ एक शक्ती नसून जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा ईश्वर सगुण रूप धारण करू शकतो’, हे कळावे’, यासाठी विविध देवता आणि संत यांच्या दिव्य दर्शनाच्या मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. नामजप करतांना ध्यान लागणे आणि ध्यानावस्थेत कुलदेवी श्री सातेरीदेवीचे दर्शन होणे : वर्ष १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पणजी येथे एक अध्यात्मविषयक कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेला मी उपस्थित होते. कार्यशाळेत सांगितल्यानुसार मी कुलदेवतेचा नामजप करायला आरंभ केला. एकदा कुलदेवीचा जप करतांना माझे ध्यान लागले. ध्यानावस्थेत मला एक काळोखी गुहा दिसली. गुहेच्या आत मला एका देवीच्या सुंदर अन् तेजस्वी मुखाचे दर्शन झाले. देवीच्या दर्शनाने मी मंत्रमुग्ध झाले; कारण यापूर्वी मी इतका सुंदर चेहरा कधीच पाहिला नव्हता. काही मिनिटे मला देवीचे दर्शन झाले अन् नंतर ती देवी अदृश्य झाली. एकदा मी परात्पर गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी मला ध्यानात दिसलेली देवी आमची कुलदेवी श्री सातेरीदेवी असल्याचे सांगितले. ही गुहा म्हणजेे देवीचे निवासस्थान असलेले वारूळ होते.
२. विष्णुसहस्रनाम म्हणत असतांना बाळकृष्णाच्या मूर्तीने स्मित करणे : वर्ष १९९६ मध्ये एकदा माझ्या आईकडे सत्यनारायण पूजा होती. त्या वेळी विष्णुसहस्रनाम म्हणत असतांना तेथील सुंदर बाळकृष्णाच्या मूर्तीने तिचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि माझ्याकडे पहात स्मित केले. ते दैवी स्मितहास्य अजूनही माझ्या स्मरणात आहे.
३. घटस्फोटाची प्रकिया चालू असतांना श्री दुर्गादेवीने स्वप्नात येऊन साधिकेला तिचा विवाह संपुष्टात आल्याचा संकेत देणे : वर्ष २००२ मध्ये विवाहानंतर निर्माण झालेल्या काही कठीण प्रसंगांमुळे मी आणि माझे यजमान एकमेकांपासून विभक्त झालो. याविषयीची न्यायालयीन प्रक्रिया चालू असतांना एकदा पहाटे मला स्वप्न पडले. त्यात श्री दुर्गादेवीने तिच्या हातातील शस्त्राने माझ्या हातातील बांगड्या फोडल्याचे दृश्य मला दिसले. यातून देवीने मला ‘विवाह संपुष्टात आला आहे’, असा संकेत दिल्याचे जाणवले.
४. न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणीच्या दिवशी पहाटे स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन होणे, त्या वेळी त्याने त्याची सोंड हलवून साधिकेला चिंता न करण्याविषयी आश्वस्त करणे : घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला बर्याचदा न्यायालयात जावे लागे. माझ्या जीवनातील हा अत्यंत तणावपूर्ण कालावधी होता. वर्ष २००३ मध्ये एका महत्त्वपूर्ण सुनावणीच्या दिवशी पहाटे माझ्या स्वप्नात श्री गणेश आला आणि त्याने त्याची सुंदर सोंड हलवली. मी सोंडेला स्पर्श केला. त्याची सोंड कापसाप्रमाणे मृदू असल्याचे मला जाणवले. त्या वेळी श्री गणेश ‘या कठीण कालावधीत मी तुझ्या समवेत आहे. चिंता करू नकोस’, असे सांगून मला आश्वस्त करत असल्याचे मला जाणवले. त्या दिवशीची न्यायालयीन सुनावणीची प्रक्रिया अत्यंत सहजपणे पूर्ण झाली.
५. श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप करतांना पणजी येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होणे : वर्ष २००९ मध्ये एके दिवशी आम्ही काही साधक श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप करत होतो. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला देवीच्या तेजस्वी मुखाचे दर्शन झाले. काही वेळाने मला तिचा चेहरा अधिक स्पष्टपणे दिसला. तेव्हा ती पणजी येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवी असल्याचे माझ्या लक्षात आले.
६. स्वप्नात भगवी वस्त्रे परिधान केलेले अनेक ऋषी दिसणे आणि जगाला आध्यात्मिक ज्ञान देणार्या ऋषींचे दर्शन झाल्यामुळे मन कृतज्ञतेने भरून येणे : २०११ या वर्षी दिवाळीला संध्याकाळी सिद्धता करतांना मी दूरचित्रवाणीवर शिवानंद अवधूतबाबा यांचा सत्संग पहात होते. त्या रात्री मला स्वप्नात भगवी वस्त्रे परिधान केलेले अनेक ऋषी शीघ्र गतीने कुठेतरी जातांना दिसले. जगाला आध्यात्मिक ज्ञान देणार्या ऋषींचे दर्शन झाल्यामुळे माझे मन कृतज्ञतेने भरून आले. काही मासांपूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगातून विविध महर्षी आणि त्यांचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले होते. ते ऐकतांना मला पूर्वीची ही अनुभूती आठवली आणि परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७. भजन ऐकतांना श्रीविष्णूचे दर्शन होणे आणि त्याचे रूप ‘सनातन संस्थे’ने प्रकाशित केलेल्या ग्रंथावरील श्री नारायणाच्या रूपाशी तंतोतत जुळत असल्याचे लक्षात येणे : जानेवारी २०१३ मधील गणेशजयंतीला मी संत अवधूत शिवानंद बाबा यांचे प्रवचन ऐकण्यास गेले होते. त्या वेळी त्यांनी ‘विघ्नविनायक गणपती नाद आदिनारायण भगवान..’ हे भजन म्हटले. डोळे मिटून हे भजन ऐकतांना माझी भावजागृती झाली आणि मला शंख अन् पद्मधारी श्रीविष्णूचे दर्शन झाले. तोपर्यंत मला श्रीविष्णूच्या नारायण अवताराविषयी काहीही ठाऊक नव्हते. काही दिवसांनी ‘सनातन संस्थे’ने प्रकाशित केलेल्या ग्रंथावरील श्री नारायणाचे चित्र हे मला दिसलेल्या रूपाशी तंतोतंत जुळत असल्याचे माझ्या लक्षात आले.
८. ‘बाळकृष्ण समवेत आहे’, असा भाव ठेवून केलेले प्रयत्न : जानेवारी २०१६ मध्ये मी ‘चिन्मय मिशन’चे श्री अभेदानंद घेत असलेली ‘श्रीकृष्ण लीला रहस्य’ या विषयावरील प्रवचन मालिका ऐकायला जात होते. प्रवचनाच्या वेळी ते ‘विविध प्रसंगांत श्रीकृष्णाच्या प्रती भाव कसा ठेवायचा ?’, हे सांगत असत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पुढील भावप्रयत्न करत असे.
अ. मी चाकरीनिमित्त प्रवास करतांना ‘बाळकृष्ण माझ्या समवेत आहे’, असा भाव ठेवत असे.
आ. एखाद्या आईप्रमाणे मी कृष्णाशी बोलत असे. तो करत असलेल्या खोड्यांसाठी त्याला रागावत असे, तसेच बाळकृष्णाला मांडीवर बसवून त्याला जेवू घालत असे.
इ. काही वेळा रुग्णांना तपासत असतांनाही मी ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत असे.
९. वर-खाली नेणार्या सरकत्या जिन्यांची (‘एस्कलेटर्स’ची) भीती वाटणे; परंतु सरकत्या जिन्यांवरून ‘बाळकृष्ण समवेत आहे’, असा भाव ठेवल्याने भीती नष्ट होणे : मार्च २०१६ मध्ये मी विदेशात असलेल्या भावंडाकडे सुटीसाठी जाणार होते. तेव्हा ‘व्हिसा (प्रवेशपरवान्यावर अनुमतीचा शिक्का)’ काढण्यासाठी पुण्याला एकटे जाण्याचा प्रसंग आला. वर-खाली नेणार्या सरकत्या जिन्यांची (‘एस्कलेटर्स’ची) मला पुष्कळ भीती वाटत असल्यामुळे मी कधीही त्यांचा वापर न करता साधा जिना अथवा उद़्वाहन (लिफ्ट) यांचा उपयोग करत असे. विदेशात साध्या जिन्यांऐवजी सरकते जिनेच (‘एस्कलेटर्स’) असल्यामुळे माझ्या भावंडांनी मला या भीतीवर मात करण्याविषयी सांगितले होते. पुण्याला जाण्यासाठी गोवा विमानतळावर गेल्यावर मी धीर एकवटून तेथील सरकत्या जिन्यांवर पाऊल ठेवल. तेव्हा ‘बाळकृष्ण माझ्या समवेत आहे’, याची मला जाणीव झाली. तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या अंगाखांद्यावर खेळत होता आणि खोड्या करत होता. त्याने कधीही मला एकटे सोडले नाही. त्यानंतर माझी सरकत्या जिन्यांची भीती नष्ट झाली. मी निर्भयपणे कित्येक मीटर लांबीच्या अशा जिन्यांवरून जाऊ लागले. मार्च ते मे २०१६ च्या कालावधीत मला अनेकदा पुणे आणि मुंबई येथे जावे लागले. त्या वेळी बाळकृष्ण माझ्या समवेत होता. त्यामुळे मला कधीही एकटे वाटले नाही. त्यानंतर माझी एकट्याने प्रवास करण्याची आणि सरकत्या जिन्यांवरून जाण्याची भीती नष्ट झाली.
१०. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना श्री दत्त अवतार नृसिंह सरस्वती यांचे दर्शन होणे : एकदा दत्तजयंतीला मला दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायला जमले नाही. त्यामुळे मी घरीच बसून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. नामजप करतांना मला एका तलावाच्या जवळ असलेल्या वटवृक्षाखाली भगवे वस्त्र परिधान केलेल्या एका तपस्वींचे दर्शन झाले. त्यांचे दर्शन झाल्यावर मला पुष्कळ शांत वाटले. ही अनुभूती मी माझ्या आईला सांगितल्यावर तिने सांगितले, ‘‘ते ‘श्री दत्त अवतार नृसिंह सरस्वती’ असू शकतील.’’ काही मासांपूर्वी झालेल्या एका भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीगुरूंच्या विविध लीलांविषयी सांगितले. तेव्हा भ्रमणभाषच्या पडद्यावर नृसिंह सरस्वतींची प्रतिमा दाखवली होती. त्या वेळी ‘वर्ष २०१७ मध्ये दत्ताचा नामजप करतांना मला नृसिंह सरस्वतींनी दर्शन दिले होते’, याचे स्मरण झाले.
११. गायनाच्या कार्यक्रमात गायकाने शिवस्तवन आरंभ केल्यावर साधिकेला भगवान शिवाचे विराट रूप दिसणे : जानेवारी २०१८ मध्ये पणजी येथील कला अकादमीने विख्यात गायक श्री. महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अकादमीच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मी उपस्थित होते. श्री. महेश काळे यांनी कार्यक्रमाचा आरंभ त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे आराध्य असलेल्या भगवान शंकराच्या स्तवनाने केला. शिवस्तवन आरंभ झाल्यावर मला भगवान शिवाच्या विराट रूपाचे दर्शन झाले. गौरवर्णीय शिवाचे मस्तक आकाशाला भिडले होते. शिवाच्या एका हातात त्रिशूळ होते आणि दुसरा हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता. शिवाचे हे रूप त्याच्या नेहमीच्या गंभीर आणि ध्यानमग्न रूपांपेक्षा पुष्कळ निराळे होते. शिवाच्या मुखावरील हास्य मंत्रमुग्ध करणारे होते. शिवाच्या या दर्शनाने माझी पुष्कळ भावजागृती झाली. शिवस्तवन संपल्यावर भगवान शिवाचे विराट रूप अदृश्य झाले. मला कर्पुरगौर (कापराप्रमाणे कांती असलेले) या शिवाच्या मूळ रूपाचे दर्शन झाले होते, हे माझ्या लक्षात आले; कारण समुद्रमंथनाच्या वेळी शिवाने विष प्राशन केल्यावर त्याची कांती निळी झाली आणि त्याला नीलकंठ नाव प्राप्त झाले.
१२. कैलास पर्वतावर विराजमान भगवान शंकर, माता पार्वती आणि बालगणेश यांचे दर्शन होणे : वर्ष २०१८ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या एका यज्ञाच्या वेळी मला कैलास पर्वतावर विराजमान भगवान शंकर, माता पार्वती आणि बालगणेश यांचे दर्शन झाले. त्या वेळी ‘भगवान शिवाने बालगणेशाला माझ्याकडे दिले आणि मी त्याला एखाद्या बाळाप्रमाणे घट्ट पकडून मिठीत घेतले आहे’, असे मला जाणवले.
१३. भावसत्संगात दत्तमहाराजांचे अस्तित्व न जाणवल्याने साधिकेला ‘आपली दत्तभक्ती अल्प आहे’, असे वाटणे, काही दिवसांनी नामजप करतांना दत्तमहाराजांचे दर्शन होऊन मन कृतज्ञतेने भरून येणे : वर्ष २०१९ मध्ये दत्तजयंतीनिमित्त भावसत्संग चालू असतांना अनेक साधकांनी त्यांना दत्तमहाराजांचे अस्तित्व जाणवल्याचे सांगितले. मला मात्र त्यांचे अस्तित्व जाणवले नव्हते. त्यामुळे माझ्या मनात ‘माझी दत्तभक्ती अल्प असल्याने मला त्यांचे अस्तित्व जाणवले नसावे’, असा विचार आला. त्यानंतर २ – ३ दिवसांनी मी खिडकीजवळ बसून नामजप करत असतांना मला दत्तमहाराजांचे दर्शन झाले. ते हसून माझ्याकडे पहात होते. कधी ‘ते माझ्या मागे आहेत’, असे जाणवत होते, तर कधी ‘ते माझ्या पुढे आहेत’, असे मला दिसत होते. तेव्हा ‘दत्तमहाराज माझ्याशी लपंडाव खेळत आहेत’, असे मला वाटत होते. त्यांची त्वचा नीलवर्णीय नव्हती, तर सनातन-निर्मित ग्रंथातील चित्रात दर्शवल्याप्रमाणे गहूवर्णीय होती. दत्तमहाराजांच्या या दिव्य दर्शनाने माझे मन कृतज्ञतेने भरून आले. त्या वेळी मला ‘मागे उभा मंगेश …पुढे उभा मंगेश….’ या भक्तीगीताची आठवण झाली.
केवळ परात्पर गुरुदेवांच्या असीम कृपेमुळेच मला या सुंदर आणि कल्पनातीत अनुभूती आल्या आहेत. ‘या अनुभूती माझ्या अंतर्मनातून कधीही पुसल्या जाऊ नयेत’, अशी इच्छा व्यक्त करून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा. (१५.८.२०२३)
|