Haniya Assassination : इराण सैन्यातील हस्तकांनी हानिया याच्या हत्येसाठी केले साहाय्य !

  • हस्तकांनी हानियाच्या खोलीत ठेवले होते बाँब !

  • २४ अधिकार्‍यांना अटक

इराणने केली २४ जणांना अटक

तेहरान (इराण) – हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येच्या प्रकरणी इराणने २४ जणांना अटक केली आहे. यामध्ये अनेक इराणी गुप्तचर अधिकारी, सैन्य अधिकारी आणि गेस्ट हाऊस कर्मचारी यांचा समावेश आहे. हानिया इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष मसूद पझाकियान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी तेहरानमध्ये आले होता. तो येथील गेस्ट हाऊसमध्ये निवासासाठी होता. तेथेच बाँबस्फोट घडवून त्याला ठार करण्यात आले होते. येथील सुरक्षेचे दायित्व इराणचे सैन्य ‘इराण रिव्होल्यूशन गार्ड कॉप्स’कडे होते.

१. ब्रिटीश दैनिक ‘द टेलिग्राफ’ने त्याच्या वृत्तात दावा केला आहे की, हानिया याच्या हत्येमागे इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आहे. मोसादने हानियाच्या हत्येसाठी  इराणमधून सुरक्षा हस्तक (एजंट) नेमले होते.

इस्माईल हानिया हत्या

२. इराणी सैन्याधिकार्‍यांच्या साहाय्याने २ मासांपूर्वीच गेस्ट हाऊसच्या ३ वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बाँब पेरण्यात आले होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाच्या वेळी मोसादला हानिया याला मारायचे होते; मात्र त्या वेळी प्रचंड गर्दी झाल्याने योजना फसली असती म्हणून ती पुढे ढकलण्यात आली.

३. यानंतर हस्तकांनी गेस्ट हाऊसच्या ३ खोल्यांमध्ये बाँब पेरले. त्यानंतर ते देश सोडून पळून गेले; मात्र त्यांचा एक साथीदार इराणमध्ये राहिला. इराणी अधिकार्‍यांना गेस्ट हाऊसमध्ये बाँब ठेवल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणही सापडले आहे.

४.  इराणच्या सैन्याधिकार्‍याने सांगितले की, त्यांच्या ‘अन्सार अल-महदी युनिट’मधील हस्तकांना मोसादने या कामासाठी नियुक्त केले होते. चौकशीनंतर त्यांना उर्वरित २ खोल्यांमध्ये बाँब ठेवलेले आढळले. सुरक्षेतील ही मोठी चूक आहे.