अमेरिका आणि ब्रिटन यांचा त्यांच्या नागरिकांना सल्ला
बेरूत (लेबनॉन) – लेबनॉनमधील इराणसमर्थित जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका अन् ब्रिटन यांनी त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिला आहे. याखेरीज अनेक देशांनीही त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचाही समावेश आहे.
१. लेबनॉनची राजधानी बेरूतमधील अमेरिकी दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, अमेरिकेला जाणारी अनेक उड्डाणे रहित, तर काही स्थगित करण्यात आली आहेत. तथापि लेबनॉन सोडण्याचे पर्याय अजूनही आहेत. ज्यांना लेबनॉन सोडायचे असेल, त्यांनी कोणतेही तिकीट घेऊन लगेच लेबनॉन सोडावे.
२. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले की, लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या ब्रिटीश नागरिकांसाठी माझा स्पष्ट संदेश आहे की, लेबनॉनमधून ताबडतोब निघून जा. आम्ही लेबनॉनमधील दूतावासाची स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तणाव अत्यधिक आहे आणि परिस्थिती कधीही बिघडू शकते.
आवश्यकता नसेल, तर लेबनॉनला जाऊ नका ! – भारत
लेबनॉनमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय लोकांनी आवश्यकता नसल्यास लेबनॉनला जाणे टाळावे. लेबनॉनमध्ये असलेल्या सर्व लोकांनी सतर्क रहावे. भारतीय दूतावासाशी जोडलेले रहावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाशी संपर्क करावा.