पुणे – पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. मागील २४ घंट्यांत पवना धरण परिसरात ३७४ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी नदीवरील पूल पाण्यात गेले आहेत. कार्ला गावातून मळवलीकडे जाणारा पूलही पाण्याखाली गेला आहे. पुढे परंदवडी-धामणे दरम्यान असणारा पूलही पाण्यात गेला आहे. यामुळे धामणे गावाचा संपर्क तुटला आहे. गावाला असलेल्या पर्यायी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल असल्याने तिथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.
पुलाचीवडी, पाटील इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले !
पुलाचीवडी, पाटील इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, अशांचे पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचे काम वेगाने चालू आहे. पाटील इस्टेट भागातल्या काही लोकांचे स्थलांतरण खाशाबा शाळा, नातावाडी येथे करण्यात आले आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.