मुंबई – मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये २१ जुलै या दिवशी मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने दिली होती. येत्या काळातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. राज्यात अन्य काही जिल्ह्यांमध्येही पावसाची चेतावणी होती. या पार्श्वभूमीवर एस्.डी.आर्.एफ्., जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
या सूचनांमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (एन्.आर्.एफ्.) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दल (एस्.आर्.एफ्.) यांनी चांगल्या प्रकारे सिद्धता ठेवावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणार्या चेतावण्यांविषयी नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साहाय्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि रहाण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था ठेवावी. सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
५ राज्यांत अतीवृष्टीची चेतावणी !
मुंबई – हवामान विभागाने देशातील पाच राज्यांत अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. हवामान विभागानुसार येत्या काही घंट्यांत उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सर्व राज्यांच्या विविध भागांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २४ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. रत्नागिरी येथे २१ आणि २२ जुलै या दिवशी ‘रेड अलर्ट’ आहे.
रायगड आणि रत्नागिरी येथे सर्वाधिक धोका
पनवेल – पावसाचा सर्वांत मोठा धोका रायगड आणि रत्नागिरी येथे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, मंडणगड, गुहागर तालुक्यांत २१ जुलै या दिवशी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. संध्याकाळी उशिरा खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला होता. यामुळे खेड नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.
दापोली आणि खेड मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नद्यांना पाणी आल्याने काही मार्ग बंद झाले होते. दापोली तालुक्यातील दाभोळ आणि नवसे भागात प्रचंड पाणी झाले. नवसे भाटी मार्गांवर, तसेच मंडणगड तालुक्यात केळवत घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस काही काळ बंद झाला होता. गुहागर तालुक्यात शिर येथे डोंगर खचला.
राजापूर – अर्जुना आणि कोदवली नद्यांना आला पूर आला. राजापूर येथे पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती झाली. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूररेषेपर्यंत आली. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन खेड नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आल आहे.
धुळे – शिंदखेडा तालुक्यातील चिलानेसह दोंडाईचा शहर परिसरात झालेल्या अतीवृष्टीने नागरिकांची हानी झाली. संसारोपयोगी साहित्य त्यांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने ग्रामस्थ पूर्णपणे कोलमडून गेले. हानीची माहिती कळताच धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना धीर दिला. हानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
मुंबईत मुसळधार पाऊस
अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रस्ता पाण्याखाली गेला. रस्त्यावर १ फूट पाणी होते. शीववरून घाटकोपर येथे जाणार्या कुर्ला येथील एल्.बी.एस्. मार्गावर २ फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली. येथून अनेक वाहने परत फिरली.
बेलापूर (नवी मुंबई) येथे धरण परिसरात ६० पर्यटक अडकले !
बेलापूर (नवी मुंबई) – ‘सेक्टर ८ बी’ येथील जय दुर्गामाता नगर येथे धरण परिसरात ६० हून अधिक पर्यटक अडकले होते. येथे पावसाचा आनंद लुटण्यासाठी ६० हून अधिक पर्यटक गेले होते; मात्र नवी मुंबई शहरात २-३ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू होता आणि २१ जुलै या दिवशी सकाळी पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकले. मुसळधार पावसाची चेतावणी दिली असूनही पर्यटक पाण्यात जाण्याचे धाडस करत आहेत. |