ग्रँट रोड येथे इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, तर ३ घायाळ !

इमारतीचा कोसळलेला भाग

मुंबई – ग्रँट रोड रेल्वे स्थानकानजीक असलेल्या ‘रुबिनिस्सा मंजिल’ या चार मजली इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील सज्जाचा भाग २० जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीनजण घायाळ झाले आहेत. इमारतीच्या राडारोड्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ७-८ रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकले होते. त्यांनाही सुरक्षितस्थळी हालवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी येऊन त्यात अडकलेल्यांना बाहेर काढले. रुबिनिस्सा मंजिल ही इमारत जीर्ण झाली असून म्हाडाने या धोकादायक इमारतीला पूर्वी नोटीस बजावली होती.