भोपाळ – शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले विदिशातील ऐतिहासिक विजय मंदिर हे क्रूरकर्मा औरंगजेबने वर्ष १६८२ मध्ये तोफांद्वारे उडवले होते. आता मध्यप्रदेश सरकारने हे मंदिर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराचा प्रथम उल्लेख अल्लाऊद्दीन खिलजी याच्यासमवेत आलेला त्याचा मंत्री अल्बेरूनी याने लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये आढळतो. त्याने लिहिले होते, ‘हे मंदिर ३१५ फूट उंच होते. भारतातील सर्वांत भव्य मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होता.’ मध्यप्रदेशचे सांस्कृतिक राज्यमंत्री धर्मेंद्र सिंह म्हणाले, ‘‘राज्यातील मंदिरे आणि प्रसिद्ध स्थळे यांच्या जीर्णोद्धाराची सिद्धता चालू आहे. आम्ही पुरातत्व विभागासमवेत काम करून ही मंदिरे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करू.’’
१० शतकात मंदिराची स्थापना !
१० व्या शतकात चालुक्य राजवंशाचे राजा कृष्ण यांचे महामंत्री वाचस्पती यांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधले होते. चालुक्य वंश हा सूर्यवंशी असल्यामुळे हे मंदिर त्यांचे कुलदैवत श्री भेल्लीस्वामी (सूर्य) यांना समर्पित आहे. या नावावरूनच पुढे हे स्थान भेलसानी आणि नंतर भेलसा म्हणून ओळखले जाऊ लागले. काही शिलालेखांनुसार या मंदिराला ‘बीजमंडल’ किंवा ‘चर्चिका’ मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
मुसलमान आक्रमणकर्त्यांनी वारंवार केले आक्रमण !
वर्ष १२२४ मध्ये प्रथम इल्तुतमिश याने या मंदिरावर आक्रमण केले. पुढे वर्ष १२५० मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा १२९० मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याचा मंत्री मलिक काफूर याने हे मंदिर उद्ध्वस्त केले. वर्ष १६८२ मध्ये औरंगजेबाने हे मंदिर तोफांद्वारे उडवले आणि मंदिरांच्याच अवशेषांचा वापर करून तेथे मशीद बांधली. त्यानंतर १७६० मध्ये पेशव्यांनी या मंदिराला दिलेले मशिदीचे स्वरूप नष्ट केले.
संपादकीय भूमिकामुसलमान आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतातील सर्वच मंदिरांचा जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे; मात्र त्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास न करता धार्मिक स्थळ म्हणून विकास झाला, तर भाविकांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे ! |