हिंदूंना हिंसक ठरवणार्‍या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून कठोर कायदेशीर कारवाई करा !

रत्नागिरीतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

रत्नागिरी, १२ जुलै (वार्ता.) – काँग्रसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेष निर्माण करणारे असे संबोधल्याने जगभरात सहिष्णु हिंदु समाजाची नाहक अपकीर्ती झाली आहे. देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हिंदूंना हिंसक ठरवणार्‍या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित (रद्द) करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना देण्यात आले.

या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या सौ. संपदा जोशी, सौ. स्नेहा ढालकर, सौ. अस्मिता सरदेसाई, सौ. संचिता बापट, बजरंगदलाचे श्री. विराज चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख श्री. गणेश गायकवाड, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री तन्मय जाधव, विष्णु बगाडे, शिवप्रसाद धुपकर आणि संजय जोशी उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,

१. यापूर्वी काँग्रेस भगवा दहशतवाद ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करून नेहमीच जागतिक पातळीवर हिंदु समाजाला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आली आहे.

२. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि हातावर पवित्र धागा बांधणे, ही शुद्ध फसवणूक होती, हे सिद्ध झाले आहे.

३. वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कुणी विस्थापित केले ? ‘सर तन से जुदा’चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते ? वर्षभरात श्रीरामनवमी, नवरात्री, आदी हिंदु सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्ती फोडणारे कोण होते ? यावर राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ?

४. संपूर्ण विश्व जिहाद्यांमुळे त्रस्त असतांना आतंकवादाचा रंग कोणता ? हे राहुल गांधी यांनी कधी सांगितलेले नाही.

५. राष्ट्रीय पातळीवरील नेत्याकडून करण्यात आलेले हे विधान अत्यंत अनुचित आणि समाजात फूट पाडणारे आहे. लोकसभेतील शपथेचा राहुल गांधी यांनी उघडपणे भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

६. समाजात भेद, द्वेष निर्माण करणार्‍या अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालावी.