Allahabad HC : धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे दुसर्‍यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर करणार्‍या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारला !

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज – धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे दुसर्‍यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. काही हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

उत्तरप्रदेशमधील महाराजगंज येथील श्रीनिवास राव नावाच्या ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंध कायदा, २०२१’च्या कलम ३ आणि ५ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. १५ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आरोपीने काही व्यक्तींना हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. त्यानंतर  त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे; पण धर्म स्वातंत्र्याचा वैयक्तिक अधिकार, हा धर्मांतराचा सामूहिक अधिकार म्हणून विस्तारित केला जाऊ शकत नाही.