अवैध मद्यसाठा नेणार्‍या वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे कर्मचारी ठार !

२ पोलीस घायाळ

मुंबई – अवैध मद्यसाठा घेऊन वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे सरकारी वाहन उलटले. यात राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचा १ कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलीस घायाळ झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध चालू आहे. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई म्‍हणाले, ‘‘संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मृत्‍यूमुखी पडलेल्‍या कुटुंबाला विभागाकडून साहाय्‍य देऊ.’’

मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातहून नाशिककडे मद्यसाठा नेणार्‍या वाहनाला सरकारी वाहन मागे टाकत होते. त्या वेळी त्या वाहनाने सरकारी वाहनाला ‘कट’ मारल्याने (जवळून नेल्याने) सरकारी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटले. (मद्याची अवैध वाहतूक करणारे किती उद्दाम असतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक) या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाले. वाहनाला पकडण्‍यासाठी नाशिक जिल्‍ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.