काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मंचर (पुणे) येथे मागणी !

निवेदन देतांना (डावीकडून) समितीचे श्री. निवृत्ती डोके, श्री. ओंकार दैने, नायब तहसीलदार श्री. मुंडे, श्री. दिलीप शेटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. नीलेश थोरात

मंचर (जिल्हा पुणे), ४ जुलै (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने येथील प्रांत कार्यालयाद्वारे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री निवृत्ती डोके, ओंकार दैने,  दिलीप शेटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. नीलेश थोरात उपस्थित होते. नायब तहसीलदार श्री. मुंडे यांना हे निवेदन देण्यात आले.

राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण, असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करण्याची मागणी केली असून,त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयीन कारवाई करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांनी यापूर्वीही ‘भगवा आतंकवाद’ किंवा हिंदु आतंकवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदु समाजाची नाहक अपकीर्ती केली होती.