नुकतीच वटपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. सौभाग्याच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी स्त्रिया व्रतस्थ राहून हा सण साजरा करतात. वडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात; मात्र इथेही हिंदूंनी आपली बुद्धी चालवलीच. बुलढाण्यातील दत्तपूर गावात या दिवशी सुवासिनींनी अन्य सुवासिनींसमवेत तेथील विधवा महिलांनाही कुंकू लावले. विधवा महिलांनीही या वेळी वडाचे पूजन करून वडाला प्रदक्षिणा घातल्या. काहीतरी वेगळे करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, मग त्यामध्ये धर्मशास्त्र पायदळी तुडवले गेले तरी चालेल, ही हिंदूंची वृत्ती इथेही दिसून आली. पिंपरीतील (जिल्हा पुणे) पिंगळे गुरव या ठिकाणी सुवासिनी करतात, तसे विवाहित पुरुषांनीही वडाचे पूजन करून आणि वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालून वटपौर्णिमा साजरी केली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वटपौर्णिमा साजरी केली जाते, त्याप्रमाणे उत्तर भारतात ‘करवा चौथ’ साजरा केला जातो. यंदाच्या करवा चौथच्या दिवशी एका कुमारिकेने आपल्या प्रियकरासाठी व्रत केले आणि त्याला ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याचे पूजन केले. धर्मशास्त्रविसंगत असे काही विचित्र प्रयोग केले, तर लगेचच प्रसिद्धी मिळते, यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होतात, नास्तिक आणि पुरोगामी मंडळी यांचे कौतुक करतात. यांना क्रांतीकारकांची उपमा देतात; मात्र असले प्रयोग करून कोणताही आध्यात्मिक लाभ न होता हानी मात्र होते, हे या महाभागांना कोण समजावणार ?
मानवी जीवनात शिस्त, नीतीनियम या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गोष्टींचे ज्या ठिकाणी पालन होत नाही, त्या ठिकाणी अनाचार माजतो. सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातही नियम असतात, त्यांचेही आपण पालन करत असतो. जशी वाहने नेहमी डाव्या बाजूने चालवावीत, तिकीट काढतांना रांग लावावी आदी सर्व नियम पाळले नाहीत, तर काही ठिकाणी दंडाची व्यवस्था करण्यात आलेली असते. प्रत्येक कचेरीतही नियम असतात. ज्या ठिकाणी अध्यात्म अथवा धर्मशास्त्र येते, त्या ठिकाणी मात्र आम्ही हिंदू ‘मलाच अधिक कळते’, ‘मी म्हणेन तेच खरे’, असे म्हणू लागतो. कामाच्या ठिकाणी पाळल्या जाणार्या वस्त्रसंहितेविषयी आपण कधी तक्रार करत नाही; व्यावहारिक जीवनात आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेतो. मग धार्मिक विषयांच्या संदर्भात बुद्धीचा वापर का करतो ? पाश्चात्त्य देशांमध्ये विज्ञानाने दिलेली सुखाची साधने मुबलक प्रमाणात असली, तरी ते सुखी नाहीत. प्राचीन भारतीय संस्कृती, ग्रंथसंपदा आपल्याला आपल्या पुण्याईने लाभली आहे, तिचा लाभ घेऊया आणि नको तिथे बुद्धीचा वापर करणे टाळूया !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.