अभिनेते रितेश देशमुख हे त्यांचे भाऊ काँग्रेसचे लातूर येथील आमदार धीरज देशमुख यांचा प्रचार करत असतांना त्यांनी हिंदु धर्माविषयी वक्तव्य केले. त्यातून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. रितेश देशमुख म्हणाले, ‘‘विरोधी पक्षांसह प्रत्येकच पक्ष म्हणतो की, धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा. अहो, आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे; पण खरे म्हणजे विरोधकांचा पक्ष धोक्यात आहे; म्हणून ते धर्म धोक्यात असल्याचे सांगतात. अशांना फसू नका, त्यांना सांगा की, धर्माचे आम्ही बघून घेतो. आपल्याला कर्माला महत्त्व द्यायचे आहे, हेच श्रीकृष्णाने सांगितले, तेव्हा तुम्ही आमच्या कामाचे सांगा. आमच्या पिकाला काय भाव देता, हे सांगा ? आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत का, ते सांगा ?’’ खरेतर भावाच्या प्रचारसभेत विरोधी पक्षांवर टीका करतांना हिंदु धर्माला मध्ये आणण्याची काही आवश्यकताच नव्हती; पण अशी वक्तव्ये केल्याविना प्रसिद्धी कशी मिळणार ? यामुळेच रितेश देशमुख यांनी जाणूनबुजून अशी विधाने केली. हिंदु धर्मावर आतापर्यंत अनेकदा आघात झाले, धर्माचे विडंबन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी रितेश देशमुख कुठे होते ? तेव्हा त्यांना धर्म का आठवला नाही ? एरव्ही धर्माविषयी काही सुवेरसुतक नसतांना किंवा त्याविषयी कधीकाळी वाच्यताही केलेली नसतांना अचानक भाषणात धर्माचे सूत्र उपस्थित केल्याने त्यांची सूत्रे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली. त्यामुळे ‘भाषणातून त्यांनी धर्माविषयी विनाकारण ज्ञान पाजळले’, असे म्हणता येईल.
मध्यंतरी प्रसारित झालेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख यांच्याकडे होते. त्या कार्यक्रमात भांडणे, मारामार्या, अश्लीलता आणि स्त्रियांना केवळ भोगवस्तू म्हणून दाखवण्यात येत होते. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील युवकांना भ्रमित करून सोडले होते. अनेकदा या कार्यक्रमातून नकळत ‘लव्ह जिहाद’चेही उदात्तीकरण केले गेले. त्या कालावधीत अनेकदा जनता सामाजिक माध्यमांतून याविरोधात स्वतःचा रोष व्यक्त करत होती, तसेच रितेश देशमुख यांनीही त्याविरोधात काहीतरी बोलणे किंवा आवाज उठवणे आवश्यक असल्याचे सांगत होती; पण रितेश यांनी त्याविषयी चकार शब्दही काढला नाही. धर्माच्या विरोधात सर्वकाही होत असतांना ते तसेच चालू ठेवण्यास अप्रत्यक्षरित्या मोकळीक किंवा समर्थन दिले. त्यानंतर आता इतक्या कालावधीने त्यांच्याकडून धर्माचा उल्लेख केला जाणे, हे सर्वथा चुकीचेच आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश जिहादी, देशद्रोही, धर्मद्रोही यांच्या संकटात पुरता होरपळला जात असतांना रितेश यांनी त्याकडे कानाडोळा करून ‘धर्मा’च्या नावाखाली स्वार्थ साधला, असेच खेदाने म्हणावे लागेल.
– श्री. नीलेश देशमुख, तळोजा, नवी मुंबई.