नवी देहली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका भागातील छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि काही लोक घायाळ झाले. नवी देहलीसारख्या भारताच्या राजधानीच्या ठिकाणच्या विमानतळावर ही दुर्घटना होणे, हे लज्जास्पद आहे. आता देहली सरकारने या व्यक्तीच्या कुटुंबाला २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून साहाय्य देणे, हा भाग ठीक आहे; मात्र नाहक गेलेल्या जिवाचे काय ? त्यामुळे कुटुंबावर झालेला आघात भरून येणार आहे का ? भारतात व्यक्तीचा मृत्यू कधी आणि कसा होईल ? याचा काही नेम नाही, हेच या घटनेतून लक्षात येते. देहली येथील आणि अन्यत्रच्या विमानतळांवर जगभरातील लोक ये-जा करत असतात. महनीय व्यक्ती, विविध देशांचे अधिकारी, राजकीय व्यक्ती, अशी विविध मान्यवरांची लगबगीची ती जागा आहे. अशा ठिकाणी छत वा भिंत कोसळणे, असे अपघात होणे, हे देशाच्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम करणारे असते. यातून देशाच्या बांधकाम क्षेत्राची दु:स्थिती लक्षात येते. विमानतळावर झालेल्या अपघातानंतर एक टर्मिनल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यामुळे विमान वाहतूक अन्य टर्मिनलवरून वळवावी लागली. काही विमानांची उड्डाणे रहित झाल्याची शक्यता आहे. प्रवाशांना याचा कोणताही त्रास न होण्याची दक्षता घेण्याचे निर्देश विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.
नवी देहलीप्रमाणे गुजरात येथील राजकोट विमानतळाच्या छताचा एक भाग कोसळून खाली पडला. या विमानतळाचे उद्घाटन जुलै २०२३ मध्येच झाले होते. येथे मात्र छत कोसळण्याच्या वेळी कुणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना होणे टळले. एक वर्षापूर्वीच उद्घाटन झालेल्या विमानतळावर अशी दुर्घटना होते कशी ? याचे उत्तरदायित्व कुणाचे ? निकृष्ट दर्जाचे साहित्य का वापरले जात आहे ? हे जनतेला समजले पाहिजे. दोन्ही दुर्घटनांमध्ये मुसळधार पावसाचे कारण त्वरित सांगितले गेले. मुसळधार पावसात वर्षभरापूर्वीचेही बांधकाम तग धरू शकले नाही, तर हा सरळसरळ भ्रष्टाचार आहे, असे सकृतदर्शनी म्हणावे लागेल.
काही दिवसांपूर्वी बातमी आली की, उद्घाटनाला महिनाही झालेला नसतांना मुंबईत बांधलेला ‘अटल सेतू’च्या उलवे म्हणजे रायगड भागातील रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. रायगड येथून या सेतूच्या रस्त्यावर प्रवेश करतांनाच मोठ्या भेगा पडलेल्या आढळणे, हे कशामुळे झाले ? याचे उत्तरदायित्व कुणाकडे ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे उद्घाटन झाले असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेलाही यामुळे धक्का बसणार नाही का ? याचा विचार का होत नाही ?
देशातील बहुचर्चित आणि दीर्घकाळ बांधकाम चालू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे किस्से, तो बांधतांना झालेल्या दुर्घटना अनेक आहेत. अगदी २ दिवसांपूर्वी महाड येथे या महामार्गाची संरक्षक भिंत नदीत कोसळली. तेथे सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अशा अपघातांच्या वेळी निकृष्ट बांधकाम करणार्यांचे उत्तरदायित्व तात्काळ ठरवून ते जनतेला का सांगण्यात येत नाही ? केवळ अपघाताचीच चर्चा होत रहाते आणि नंतर पुढील अपघात. लोक नंतर हा विषयही विसरून जातात. बांधलेला नवीन रस्ता दुसर्या, तिसर्या दिवशीच उखडला जातो, त्यावर खड्डे पडतात, रेल्वे रूळ पाण्यात वाहून जातात. असे प्रथम अतार्किक किंवा अशक्य वाटते; मात्र भारतात ते प्रत्यक्षात घडते. विदेशात कधी अशा बातम्या वारंवार ऐकल्या आहेत का ? किंवा बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झालेली वास्तू कोसळली, अशी बातमी तरी ऐकली आहे का ?
प्राचीन तंत्रज्ञान श्रेष्ठ !
ज्या भारतात जगाला तोंडात बोटे घालायला लागतील, अचंबित व्हावे लागेल, अशी मंदिरांची रचना, अशी शिल्पे, राजवाडे, बहुमजली इमारती, समुद्रातील दुर्ग, गड बांधले गेले आहेत. अनेक शतके ती ऊन, पाऊस, वादळ आणि भूकंपाचे धक्के यांमध्ये टिकली आहेत, मग तेव्हाचे तंत्रज्ञान प्रगत म्हणावे लागेल किंवा तेव्हाचे तंत्रज्ञ, अभियंते, कामगारच श्रेष्ठ अन् परिपूर्ण काम करणारे होते, असेच सांगावे लागेल आणि ती वस्तूस्थितीही आहे. त्याकाळी कोणतीही आधुनिक सामग्री नसतांना काही टन वजनाचे दगड काही मीटर उंच असलेल्या मंदिराच्या घुमटाच्या ठिकाणी ठेवण्यात आले, जे अनेक शतकांनंतरही निखळलेले नाहीत अथवा ते पडून जीवित अथवा वित्त यांची हानी झालेली नाही. भगवान श्रीकृष्ण रहात असलेल्या द्वारकेचे अवशेष समुद्राच्या पाण्याखाली आहेत. त्या नगरीची संरक्षक भिंत जी काही किलोमीटर लांब आहे, समुद्राच्या पाण्यात ५ सहस्र वर्षांहून अधिक काळ आहे तशीच आहे. असे बांधकाम करण्याची परंपरा असणार्या भारतात आता झाले आहे तरी काय ?
काही मोजकी बांधकामे सोडल्यास प्रत्येक वास्तूमध्ये काहीतरी अडचण काही महिने ते वर्ष एवढ्या कालावधीत का निर्माण होते ? आपला अभ्यास कुठे अल्प झाला ? अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी महाविद्यालये, संस्था यांमध्ये विद्यार्थ्यांना नीट शिकवत नाहीत का ? उद्या होणार्या अभियंत्यांमध्ये त्यांच्याकडून काही चूक झाल्यास जीवितहानी होण्याची संवेदनशीलता निर्माण केली जात नाही का ? अशा अनेक गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
कधी कोणत्या बांधकामाच्या वेळी अपघात झाला, तर आपण थेट निकृष्ट साहित्याला उत्तरदायी धरतो किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल, असा निष्कर्ष काढतो; मात्र निकृष्ट साहित्य असल्यास संबंधिताला ते वापरण्याचे ज्ञान नव्हते कि दुर्बुद्धी झाली ? याच्या खोलात जाणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामे कंत्राटदारांकडूनच कंत्राट देऊन करवून घेतली जातात. अपघात झाल्यास या कंत्राटदारांना काळ्या सूचीत टाकून विषय मिटवला जातो; पण दुर्घटना घडतच रहातात. राष्ट्रीय स्तरावर या समस्यांवर गहन चिंतन, अभ्यास करून नेमके कुठे अल्प पडत आहोत, हे पहाण्याची तसदी बांधकाम क्षेत्रातील अधिकारी आणि तज्ञ कधी घेणार ? संपूर्ण बांधकाम क्षेत्राची दुर्दशा झाली आहे किंवा संपूर्ण बांधकाम क्षेत्रच कुचकामी आहे, असे येथे म्हणायचे नाही. स्वातंत्र्योत्तर काळात अन्य क्षेत्रांप्रमाणे बांधकामामध्ये भारतियांची प्रगती आहे. नवीन, आश्चर्यकारक बांधकामे आणि वास्तू उभ्या रहात आहेत; मात्र त्यांचा टिकण्याचा कालावधी अल्प दिसत आहे. वास्तू किंवा बांधकाम जागतिक दर्जाचे असे म्हणण्यापेक्षा भारतियांचा स्वत:चा दर्जा त्यातून लक्षात आला पाहिजे. ते सुरक्षित आणि अचूक असले पाहिजे. या दृष्टीने, तसेच नैसर्गिक संकटांच्या वेळी वास्तू तग धरून राहील, याचा विचार सर्वच बांधकामांमध्ये करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने प्रशासन आणि तज्ञ यांनी एकत्र येऊन दिशानिर्देशन करण्याची आवश्यकता आहे.