अग्रवाल पिता-पुत्राला जामीन दिल्यास ते देशाबाहेर पळून जाऊ शकतात ! – पुणे पोलिसांचा दावा

पुणे कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण !

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील गाडीचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकला. या घटनेतील १० साक्षीदार असून त्यातील काही साक्षीदार आरोपींकडेच कामाला आहेत. या गुन्ह्यामध्ये विशाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना जामीन मिळाल्यानंतर ते तक्रारदार आणि साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतात. पुराव्यांमध्ये छेडछाड (पालट) करून परदेशी पळून जाऊ शकतात, असा दावा पुणे पोलीस आणि सरकारी अधिवक्ते यांनी केला. सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला पोलीस आणि सरकारी अधिवक्त्यांनी विरोध केला. हा युक्तीवाद २६ जून या दिवशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन्.एस्. बारी यांच्या न्यायालयामध्ये झाला.

बचाव पक्षाकडून अधिवक्ता प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. यावर १ जुलै या दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे, तसेच रक्ताचे नमुने पालटल्याप्रकरणी ‘ससून’मधील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी जामीन अर्ज दिला होता. त्यालाही पुणे पोलिसांनी विरोध केला आहे.