कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा चौथा दिवस (२७ जून)

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

विश्व अनादी आहे आणि या विश्वाचा नियंता ईश्वर आहे. या विश्वाचा कारभार वेदांनुसार चालतो. अन्याय करणार्‍याला नरकयातना भोगाव्या लागतात, तर योग्य वर्तन करणार्‍याला चांगले फळ प्राप्त होते, अशी विश्वाची व्यवस्था आहे. जे भगवंताला मानत नाहीत, त्यांचा यावर विश्वास नाही. धर्म समजण्यासाठी भगवंताने वेदांची निर्मिती केली. सोने जुने झाले; म्हणून त्याचे मूल्य न्यून होत नाही. त्याप्रमाणे वेद पुरातन असले, तरी त्यातील ज्ञान कालबाह्य होत नाही. भगवंताकडे अगाध ज्ञान आहे.

सत्ययुगातही आगीत लाकूड टाकल्यास ते जळत होते आणि कलियुगातही जळते. त्याप्रमाणे वेदांमधील ज्ञान शाश्वत आहे. हे सांगणारा मनु हा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती होता. मनु हा राजा होता. जेव्हा पाश्चात्यांना कपडे परिधान करण्याचेही ज्ञान नव्हते, तेव्हा मनु याने ‘मनुस्मृती’ लिहिली. असे ज्ञान देणार्‍या मनु याला मी पूज्य मानतो. अनेक देशांनी कायदे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला. ‘मनुस्मृती’, ‘वेद’ आणि अन्य धर्मग्रंथांचा अवमान सहन करू नका, असे आवाहन भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी ‘मनुस्मृतीवर होणारे राजकारण कसे रोखावे ?’, या विषयावर मार्गदर्शन करतांना केले.