‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होत आहे. हा महोत्सव म्हणजे हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्या विचारमंथनासाठीचे अधिवेशन आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २३ जून २०२४ या दिवशी धर्मध्वज फडकावून त्याचे विधीवत् पूजन सायंकाळी ५.३० वाजता करायचे ठरवले होते. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती मिळावी आणि हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरावी’, हे २ उद्देश ठेवून धर्मध्वज फडकावून त्याचे विधीवत् पूजन करायचे होते. धर्मध्वजाचे पूजन करण्याच्या अगोदर सायंकाळी ५.१० वाजता पावसाला आरंभ झाला. त्यामुळे ‘धर्मध्वजाचे पूजन करण्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये’, यासाठी मला नामजपादी उपाय करण्यास सांगण्यात आले.
१. धर्मध्वजाचे पूजन ठरवलेल्या वेळेच्या २० मिनिटे आधी जोराचा पाऊस पडू लागणे आणि १७ मिनिटे नामजपादी उपाय केल्यावर पाऊस पडणे पूर्ण थांबून अन् आकाश मोकळे होऊन सूर्यप्रकाश पडणे
मी सायंकाळी ५.१५ वाजता वरुणदेव आणि गुरुदेव यांना प्रार्थना करून नामजपादी उपाय करायला बसलो. तेव्हा मला धर्मध्वजाचे पूजन करण्यामध्ये आलेला अडथळा माझ्या चेहर्यासमोर असलेल्या त्रासदायक (काळ्या) शक्तीच्या आवरणाच्या स्वरूपात जाणवला. मी ‘महाशून्य’ हा नामजप करत माझ्या चेहर्यासमोर असलेले काळ्या शक्तीचे आवरण दूर केले. यासाठी मला ३ – ४ मिनिटे लागली. त्यानंतर मला धर्मध्वजाचे पूजन करण्यामध्ये आलेला अडथळा माझ्या डोळ्यांमध्ये असलेल्या त्रासदायक शक्तीच्या स्वरूपात जाणवला. त्यामुळे मी माझ्या उजव्या हाताचा तळवा माझ्या डोळ्यांसमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरला, तसेच माझ्या डाव्या हाताचा तळवा माझ्या डोक्याच्या मागे १ – २ सें.मी. अंतरावर धरला आणि मी ‘महाशून्य’ हा नामजप २ – ३ मिनिटे केला. तेव्हा पावसाचा जोर जरा अल्प झाला होता. मी डोळ्यांसमोर आणि डोक्याच्या मागे आधीप्रमाणेच माझे तळहात ठेवून ‘शून्य’ हा नामजप २ – ३ मिनिटे केला. त्यानंतर पाऊस पडणे ९५ टक्के थांबले होते आणि आकाशात सूर्यकिरणही दिसू लागले. त्यानंतर मी २ मिनिटे ध्यान लावले. तेव्हा पाऊस पडणे पूर्णपणे थांबून आकाश मोकळे झाले होते. तसेच सूर्यप्रकाशही पडला होता. त्यामुळे मी सायंकाळी ५.३२ वाजता ‘आता तुम्ही धर्मध्वजाचे पूजन करू शकता’, असे कळवले आणि कृतज्ञता व्यक्त केली. मला नामजप करायला एकूण १७ मिनिटे लागली.
२. धर्मध्वजाच्या पूजनास आरंभ झाल्यावर पुन्हा आकाशात काळे ढग दिसू लागणे, ५ मिनिटे नामजपादी उपाय केल्यावर काळे ढग दूर होऊन सूर्यकिरण दिसू लागणे आणि ध्यान लावून उपाय केल्यावर पूजन निर्विघ्नपणे पार पडणे
सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजाचे पूजन आरंभ झाले. तेव्हा सायं. ६.०५ वाजता पुन्हा आकाशात काळे ढग दिसू लागले. त्यामुळे ते काळे ढग दूर होण्यासाठी पुन्हा नामजपादी उपाय करण्यास मला सांगण्यात आले. त्या वेळी मला तो अडथळा माझ्या डोळ्यांमधील त्रासदायक शक्तीच्या स्वरूपात जाणवला. तो दूर करण्यासाठी मी माझ्या उजव्या हाताचा तळवा माझ्या डोळ्यांसमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरला, तसेच माझ्या डाव्या हाताचा तळवा माझ्या डोक्याच्या मागे १ – २ सें.मी. अंतरावर धरला आणि ‘शून्य’ हा नामजप ५ मिनिटे केला. त्यानंतर आकाशातील काळे ढग पूर्णपणे दूर झाले आणि आकाशात पुन्हा सूर्यकिरण दिसू लागले. पूजनाचा संपूर्ण विधी साधारण अर्ध्या घंट्याचा होता. त्यामुळे मला ‘त्या संपूर्ण कालावधीत कोणताही अडथळा येऊ नये’, यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्या कालावधीत मी ध्यान लावून उपाय केले. ईश्वराच्या कृपेने सायंकाळी ६.३९ वाजता धर्मध्वजाचे पूजन निर्विघ्नपणे पार पडले. यासाठीही मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) आणि ईश्वर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. नंतर सायंकाळी ६.४५ वाजता पाऊस चालू झाला.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |