वेदसंस्कृतीचा अभिमान हवा !

प्रतिकात्मक छायाचित्र

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांची ओळख आहे. उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी त्यांची पत्नी सौ. स्नेहल या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकताच त्यांनी ‘स्टडी ऑफ वेदाज्’ (वेदांचा अभ्यास) हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्या परीक्षेत त्यांना ७८ टक्के गुण मिळाले आहेत. वेदाभ्यासाविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘स्वतःला हिंदु म्हणवतांना, हिंदु धर्माला सर्वश्रेष्ठ मानतांना, तो धर्म ज्या चार वेदांवर आधारित आहे, त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही, याची खंत मला अनेक दिवस होती. पुण्यातील ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम’ या संस्थेच्या ‘स्टडी ऑफ वेदाज्’ या अभ्यासक्रमात उत्तीर्ण होऊन ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मिळाली.’’

वेद हे भारतीय धर्म आणि संस्कृती यांचे मूलाधार ग्रंथ आहेत. जगातील पहिले साहित्य ‘वेद’ आहे. परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी मानवसृष्टीच्या निर्मितीपूर्वी वेद निर्माण केले, म्हणूनच ते ‘अनादी’ आहेत. वेद हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्मय नसून जीवनात त्या ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा ? याचे योग्य मार्गदर्शन  करणारा महान ठेवा आहेत. सद्यःस्थितीला सनातन वैदिक हिंदु धर्म , प्राचीन हिंदु संस्कृती, परंपरा यांच्याविषयी आदर आणि विश्वास ढळत चालला आहे. शालेय शिक्षणात वैदिक ज्ञान वृद्धींगत करणारे विषय अंतर्भूत नसल्याने विद्यार्थांना वैदिक ज्ञानाची अलौकिकता लक्षात येत नाही. त्याविषयी गोडी अथवा जिज्ञासा निर्माण होत नाही. नंतर याच बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडून आधुनिक विचारसरणीच्या नावाखाली सनातन वैदिक हिंदु धर्मावर सातत्याने चिखलफेक केली जाते. त्यातूनच सर्व सामान्यांची हिंदु देवता, धर्म  यांविषयीची श्रद्धा कमकुवत होतांना दिसते. अशा वेळी सौ. स्नेहल तरडे यांची ‘वेदांचा अभ्यास करण्याची इच्छा, वेद जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यावर प्रयत्नपूर्वक  केलेली कृती’, हे निश्चितच कौतुकास्पद आणि हिंदु धर्मियांसाठी प्रेरणादायी ठरते. सौ. स्नेहल यांनी वेदांचा अभ्यास केल्यानंतर या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. केवळ बुद्धीप्रमाण्यवाद्यांच्या टीकेवर अंधविश्वास न ठेवता तरुणांनी सनातन वैदिक हिंदु धर्माविषयी  मनामध्ये जिज्ञासा ठेवून त्याचा सखोल अभ्यास करावा आणि नंतरच या प्राचीन धर्माविषयी मत सिद्ध करावे. वेदांचे वैभव जतन करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. त्या दृष्टीने चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीचा आदर्श  डोळ्यांसमोर ठेवून वेदांचा अभ्यास करूया, जेणेकरून हिंदुद्वेष्ट्यांकडून हिंदु धर्माविषयी केल्या जाणार्‍या अपप्रचाराला तोंड देता येईल, तसेच त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या टीकांचे सडेतोड खंडण करणे सर्वांना शक्य होईल !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.