Nikhil Gupta Extradition : आरोपी निखिल गुप्ता याचे चेक रिपब्लिक देशामधून अमेरिकेकडे प्रत्यार्पण

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण

खलिस्तानी आतंकवादी पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला युरोपातील चेक रिपब्लिक देशामध्ये एक वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. आता गुप्ता याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. निखिल गुप्ता याला १६ जून या दिवशी अमेरिकेतील ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आणण्यात आले होते. आता त्याला न्यूयॉर्क न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.

१. निखिल याला चेक रिपब्लिकच्या पोलिसांनी ३० जून २०२३ या दिवशी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीवरून अटक केली होती. यानंतर चेक प्रजासत्ताक न्यायालयाने निखिल गुप्ता याची अमेरिकेतील प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली होती.

२. पन्नू याचा अमेरिकेत हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी न्यूयॉर्क पोलिसांचे आरोपपत्र २९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी उघड झाले होते. यामध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

३. न्यूयॉर्कमध्ये पन्नूवर प्राणघातक आक्रमण करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप अमेरिकी सरकारने केला होता. ‘यात भारताचा हात होता’ असाही आरोप करण्यात आला. हत्येचा कट उधळून लावला, असा दावा अमेरिकेना केला होता; मात्र ही हत्या  कोणत्या दिवशी होणार हे अमेरिकेडून सांगण्यात आलेले नाही.

४. जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीनंतरच अमेरिकी अधिकार्‍यांनी भारतासमोर हे सूत्र उपस्थित केले होते.

संपादकीय भूमिका

पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी आवाहन करणार्‍या पन्नूला अमेरिका कधी अटक करून भारताच्या कह्यात देणार ?