हडपसर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

  • शेकडो शिवप्रेमींचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !

  • समाजकंटक पोलिसांच्या कह्यात !

हडपसर (जिल्हा पुणे), १५ जून (वार्ता.) – ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर १२ जून या दिवशी सायंकाळी ७ वाजता एका समाजकंटकाने दगड भिरकावला. त्यामुळे सर्व शिवभक्त, तसेच हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. महापुरुषांची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी आणि या कृत्याच्या मागे आणखी कोण आहे ?, याचे सखोल अन्वेषण करावे, अशा मागण्या शिवप्रेमींनी पोलिसांना निवेदनाद्वारे केल्या. या प्रकरणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंद करून घेतला आहे, तसेच त्या समाजकंटकाला कह्यात घेतले आहे.

उद्या हिंदु जनआक्रोश मशाल मोर्च्याचे आयोजन !

श्री वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा जाहीर निषेध आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ १६ जून या दिवशी गाडीतळ ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत ‘हिंदु जनआक्रोश मशाल मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला आमदार नितेश राणे आणि श्रीमती स्वाती मोहोळ उपस्थित असणार आहे.

कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन !

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ १६ जून या दिवशी  ससाणेनगरमधील सर्व शिवभक्त आणि ग्रामस्थ यांच्या वतीने हडपसर गाव आणि परिसरामधील सर्व ग्रामस्थ, शिवभक्त अन् व्यापारी यांना कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करू धजावणार नाही, अशी पत पोलिसांनी निर्माण केली पाहिजे !