नवी देहली – सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याविषयी विचारमंथन चालू झाले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने १० प्रमुख मंत्रालयांच्या सचिवांकडे या योजनेचा आढावा घेण्याचे दायित्व सोपवले आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या सैनिकांना ‘अग्निवीर’ म्हणतात. ‘अग्निपथ’ योजना अधिक आकर्षक कशी करता येईल ?, याविषयीही त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अग्निवीरांच्या भरतीचे सूत्र बरेच गाजले होते. या योजनेला विरोधकांच्या इंडि आघाडीचा तीव्र विरोध आहे. सत्ताधारी आघाडीतील काही घटक पक्षांनीही ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याचा सल्ला भाजप सरकारला दिला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.