मागील आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये झालेल्या विक्रमी वाढीची कारणे, सोन्याचे दर कसे वाढत गेले ? सोन्यामध्ये गुंतवणूक का करण्यात येत आहे ? याविषयी जाणून घेतले. चांदीचीही तशीच वाटचाल आहे. चांदीचे भाव बाजारात विक्रमी उच्चांक गाठत आहेत. एवढी भाववाढ गत अनेक वर्षांमध्ये झाली नव्हती, म्हणून ती ऐतिहासिक आहे. चांदीची भाववाढ अशी चालू राहिल्यास ती सोन्यालाही मागे टाकेल, अशी स्थिती आहे.
१. चांदीचे वाढते भाव
चांदीचे भाव वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक वाढले आहेत, याच काळात सोन्याचे भावही वाढले आहेत; मात्र चांदीमध्ये विक्रमी भाववाढ झाल्याने त्याचा फटका सोन्यालाही बसला आहे. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार चांदीचा आताचा प्रतिकिलो भाव ९८ सहस्र रुपये झाला आहे. १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी चांदी ६९ सहस्र १५० रुपये प्रतिकिलो होती, तेव्हापासून चांदीचे भाव ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. चांदीने २२ टक्के परतावा दिला आहे, तर सोन्याने १७ टक्के परतावा दिला आहे, म्हणजे चांदी सोन्याच्याही पुढे जाणार आहे, असे चित्र आहे.
तज्ञांच्या अनुसार १ किलो चांदीचा भाव १ लाख १० सहस्र रुपयांहून अधिक रकमेत जाणार आहे, तसेच त्यापुढेही तो वाढण्याची शक्यता आहे.
२. चांदीची मागणी का वाढली ?
सोन्याप्रमाणे चांदीच्या भाववाढीला भू-राजकीय अस्थिरता हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. हमास-इस्रायल युद्ध, युक्रेन-रशिया युद्ध, त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती यांमुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्यासह चांदीचीही खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे, तसेच अद्यापही केली जात आहे. त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
औद्योगिक कारणांसाठी चांदी हा चांगला धातू आहे. चांदी आणि सोने हे धातू हे सर्वांत चांगले वाहक धातू (कंडक्टर) म्हणून ओळखले जातात. संगणकात अथवा अन्य ठिकाणी जो मुख्य ‘प्रोसेसर’ वापरला जातो, तो जोडण्यासाठी सोन्याचा उपयोग होतो.
चांदीचा उपयोग ‘सेमीकंडक्टर’पासून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांत होतो. त्यांची चांगली वाहकक्षमता इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लाभदायक होते. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी (‘एआय’साठी) लागणारी उपकरणे, सौर पॅनल, भ्रमणभाषसंच, टीव्ही संच, संगणक आणि संगणकीय सुटे भाग, छायाचित्रक, मायक्रोव्हेव ओव्हन इत्यादी अनेक उपकरणांमध्ये चांदीचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटसाठीचे ‘५ जी’ तंत्रज्ञान वापरासाठी लागणारी उपकरणे, इलेक्ट्रिकल वाहने (दुचाकी आणि चारचाकी) यांसाठी चांदीचा उपयोग होत असल्याने उद्योगसमुहांकडून चांदीची मागणी वाढली आहे. चांदीची मागणी केवळ भारतातच नव्हे, तर जगभर वाढत आहे. ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘चीप’ निर्मितीच्या कारखान्यांमध्ये वाढ होत असल्याने तेथूनही चांदीची मागणी वाढते.
भारतात शाश्वत ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेला सरकारकडून प्राधान्य देण्यात येत असल्याने त्यावर आधारित उपकरणे सिद्ध करण्यासाठी चांदीची मागणी आपोआप वाढतेच. सौर पॅनलसह बॅटरीमध्ये वापरण्यास चांदी महत्त्वाचा धातू आहे.
अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती अधिक गतीने होत आहे, तेथे चांदीची मागणी वाढली आहे. आधी उद्योगांमध्ये तांबे, जस्त इत्यादी धातूंना अधिक मागणी होती. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, उपकरणे नव्या आधुनिक स्वरूपात येत आहेत, अशा वेळी चांदीचा अधिक उपयोग उद्योग करत आहेत, म्हणजे ज्या वेगाने या उद्योगांनी वेग पकडला आहे, ज्या वेगाने चांदीची मागणी असते, त्या तुलनेत त्याचा पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे साहजिकच भाववाढ होते. उद्योगसमूह किलो ते टन या स्वरूपात चांदीची खरेदी करत असल्याने मागणी आणि पुरवठा या साखळीवर परिणाम होऊन चांदीचा भाव वाढला आहे.
२ अ. पुरवठा कमी होणे : जागतिक बाजारपेठेत सलग ३ वर्षांपासून चांदीच्या पुरवठ्यात घट झाली आहे. यामुळे किंमतीत वाढ झाली आहे.
२ आ. प्रचंड जागतिक मागणी : महागाई, भू-राजकीय अस्थिरता, आर्थिक अनिश्चितता यांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांदीकडे वळत आहेत. यामुळे मागणी वाढली आहे आणि किमतीतही वाढ झाली आहे.
२ इ. अमेरिकेच्या डॉलरमध्ये कमकुवतपणा : अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरल्यास, म्हणजे तो कमकुवत झाल्यास चांदीसारख्या महागड्या धातूंची किंमत वाढते; कारण जेव्हा डॉलर कमकुवत असतो, तेव्हा इतर चलनांमध्ये त्याची खरेदी अधिक महाग होते.
३. रुपयाचे अवमूल्यन
भारतीय रुपयाचे मूल्य अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत अल्प झाल्याने (१ डॉलर म्हणजे ८२ रुपये) त्यामध्ये चांदी खरेदी केल्यास किंमत वाढते. चांदी आयात माल असल्याने कमकुवत झालेल्या रुपयामुळे चांदीची किंमत वाढते.
४. अल्प व्याजदरांमुळे लोकांचा कल सोन्या-चांदीकडे !
वाढत्या महागाईमुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदी यांसारख्या महागड्या धातूंमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होतात. अधिकोषांचे मुदत ठेवीवरील लाभांश अल्प झाल्याने लोक ‘म्युच्युअल फंडा’त गुंतवणूक करतात, काही जण शेअर (समभागात) बाजारात गुंतवतात; मात्र मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संकट जाणवल्यास सतर्क गुंतवणूकदार शेअर बाजारातून पटपट पैसे काढून घेतात. परिणामी शेअर बाजार कोसळतो, अन्य गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडतात. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास ‘लोकसभा २०२४’ निवडणुकांच्या निकालाच्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ‘इंडी’ आघाडी यांच्यात स्पर्धा चालू असतांना, म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जिंकलेल्या जागा घटतांना (भाजपच्या जागा न्यून झाल्यामुळे) सेन्सेक्स २ सहस्र ८०० हून अधिक अंकांनी, तर ‘बाँबे स्टॉक एक्सेंज’ ६ सहस्रांहून अधिक अंकांनी घसरला. याच्या परिणामस्वरूप गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी एवढ्या अवाढव्य रुपयांची काही घंट्यांमध्ये आर्थिक हानी झाली. याच रकमेपैकी काहींनी चांदी-सोने खरेदीत रक्कम गुंतवल्यास तात्कालिक चांदी आणि सोने यांचे भाव एकदम वाढतात.
५. भारतियांकडून चांदीचे दागिने सिद्ध करणे
चांदीचा उपयोग उद्योगांमध्ये ६० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत असला, तरी सोन्याप्रमाणे चांदीचे दागिने भारतियांना प्रिय आहेत. चांदीमध्ये दागिने सिद्ध करून घेण्यासाठी मागणी आहेच. चांदीची नाणी, प्रतिमा, वस्तू यांना मागणी आहेच. सोन्याच्या भाववाढीमुळे अल्प खर्चिक पर्याय म्हणून लोकांकडून चांदीचे दागिने बनवण्याकडे कल गेला आहे.
अशा प्रकारे विविध कारणांसाठी चांदीची मागणी वाढत आहे. तज्ञांच्या दृष्टीने चांदीचे भाव खाली येण्याची शक्यता अल्पच आहे. ज्या गतीने त्याची मागणी वाढते, त्या गतीने चांदीच्या खाणीतून त्याचा पुरवठा करणे अशक्य आहे. परिणामी सोन्याप्रमाणे चांदीचे भाव वाढतच रहाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. चांदीच्या वस्तू, दागिने हवेतील हायड्रोजन सल्फाईडशी संयोग होऊन आणि रासायनिक प्रक्रिया होऊन काळे पडतात. एवढी एक त्यातील अडचण सोडल्यास चांदीच्या वस्तू आणि दागिनेही टिकाऊ असतात.
६. सोन्या-चांदीत गुंतवणूक करावी का ?
मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेला ‘सोन्याचे भाव का वाढत असतात ?’, हा लेख वाचून काहींनी ‘सोन्यात गुंतवणूक करावी का ?’, असे विचारले. आता चांदीविषयी लेख वाचून काही जण विचारतील, ‘चांदीमध्ये गुंतवणूक करावी का ?’ याचे उत्तर असे आहे की, हे लेख माहितीपर आहेत, म्हणजे सध्याच्या सोन्याच्या स्थितीविषयी, चांदीच्या स्थितीविषयी विविध बारकावे लेखाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोन्यामध्ये अथवा चांदीमध्ये गुंतवणूक करावी कि न करावी ? हा निर्णय प्रत्येकाला स्वत:ची आर्थिक क्षमता, आवश्यकता, भविष्यातील आिर्थक नियोजन यांनुसार घेता येऊ शकतो अथवा या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करून घेता येऊ शकतो.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (३.६.२०२४)