Khalistani Protest : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी लावली इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृश्य असलेली भित्तीपत्रके !

ओटावा – कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृश्य असलेली भित्तीपत्रके लावली आहे. या माध्यमातून त्यांनी भारतियांना धमक्या देणे चालू केले आहे. या भित्तीपत्रकांत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आणि त्यांचे मारेकरी हातात बंदुका घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी याविषयी चिंता व्यक्त केली.

कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य

चंद्रा आर्य म्हणाले, ‘‘हा धमक्यांचा सत्र चालूच आहे. काही महिन्यांपूर्वी ‘शीख फॉर जस्टिस’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी पन्नू याने हिंदूंना भारतात परत जाण्यास सांगितले होते. अशा फलकांचा वापर हिंदूंना धमकावण्यासाठी केला जात आहे. या गुन्हेगारांना मोकळे सोडले, तर ते खरोखर ते धोकादायक ठरू शकतात. इंदिरा गांधी यांच्या कपाळावर कुंकू दाखवणे, याचा अर्थ खलिस्तानी आतंकवाद्यांचे लक्ष्य ‘हिंदू-कॅनेडियन’ हे आहेत, हे उघड होते.’ कॅनडाच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.’’